Soybean Rate : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी हाती येत आहे. राज्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीला बहुमत मिळाले आहे. लवकरच महायुतीचे नवीन सरकार सत्ता स्थापित करणार आहे. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा लवकरच संपन्न होईल आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे.
मात्र विधानसभा निवडणुका संपन्न झाल्यानंतर राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे निवडणुकीनंतर राज्यातील काही बाजारांमध्ये सोयाबीनचे दर वाढले आहेत. निवडणुकीपूर्वी चार हजाराच्या आत असणारे सोयाबीनचे बाजार भाव निवडणूक संपल्यानंतर लगेचच 5000 च्या वर गेले आहेत.
यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. आगामी काळात बाजार भाव आणखी वाढतील अशी आशा देखील आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक. यावर्षी खरीप हंगामाच्या एकूण लागवडी खालील क्षेत्रापैकी जवळपास 34 टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली.
महत्त्वाचे म्हणजे यंदा पाऊस पाणी चांगला असल्याने सोयाबीनचे शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन मिळाले आहे. काही भागात जास्तीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नक्कीच नुकसान झाले आहे मात्र बहुतांशी ठिकाणी शेतकऱ्यांना या पिकातून चांगले उत्पादन मिळाले असून आता बाजार भाव देखील चांगला मिळावा अशी अशा शेतकऱ्यांना आहे.
या हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 4892 प्रतिक्विंटल एवढा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. मात्र अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना हमीभावाएवढाही दर मिळत नव्हता ही वास्तविकता होती. मात्र निवडणुकीच्या आधी असणारी ही परिस्थिती निवडणुकीनंतर थोडीशी बदलली आहे.
सोयाबीन बाजारभावात आता थोडी वाढ झाली असून त्याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. लोकसभा निवडणुकीत कांदा कापूस सोयाबीन अशा विविध शेतमालाच्या बाजारभावावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले होते.
महत्त्वाचे म्हणजे सत्ताधाऱ्यांना याचा फटका देखील बसला होता. विधानसभा निवडणुकीत देखील सोयाबीन बाजारभावाचा मुद्दा चर्चेत आला होता. निवडणुकीच्या काळात सोयाबीनला फारच कमी दर मिळत असल्याने सत्ताधाऱ्यांना याचा फटका बसेल असे म्हटले जात होते.
मात्र सोयाबीनची हमीभावाने खरेदी सुरू करण्यासाठी शासनाने खरेदी केंद्र सुरू केलीत यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आणि आता निवडणुकीनंतर सोयाबीनचे बाजार भाव वधारू लागले आहेत. मात्र असे असले तरी राज्यातील काही बाजारांमध्ये अजूनही सोयाबीनचे दर पाच हजाराच्या आतच आहेत.