Wheat Farming : सध्या रब्बी हंगाम सुरू असून रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर हरभरा आणि गहू पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी बांधव शेतशिवारात लगबग करत आहेत. दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या रब्बी हंगामात गहू पेरणी करण्याच्या तयारीत असाल आणि अजून गहू पेरणी केलेली नसेल तर तुमच्यासाठी आजचा लेख कामाचा ठरणार आहे.
कारण की आज आपण गव्हाच्या सुधारित जातींची माहिती पाहणार आहोत. 15 नोव्हेंबर पर्यंत पेरणी करता येणाऱ्या म्हणजेच वेळेवर पेरणी करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या गव्हाच्या सुधारित जातींची आता आपण माहिती जाणून घेणार आहोत.
आम्ही सांगत असलेल्या जातींची तुम्ही 15 नोव्हेंबर पर्यंत पेरणी करून नक्कीच चांगले उत्पादन मिळवू शकणार आहात. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी सविस्तर.
वेळेवर पेरणी करता येणाऱ्या गव्हाच्या सुधारित जाती
तपोवन (NIAW 917) : या जातीपासून शेतकऱ्यांना एकरी 18 ते 20 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते असा दावा कृषी तज्ञांनी केला आहे. याबाबत बोलायचं झालं तर या जातीचे पीक अवघ्या 115 दिवसात परिपक्व होते. गव्हाचा हा एक प्रमुख सरबती वाण असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये याची लागवड होते.
या जातीपासून मिळणाऱ्या गव्हापासून उत्कृष्ट दर्जाच्या चपाती आणि पाव तयार होतात. वेळेवर पेरणी करण्यासाठी म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी करण्यासाठी या जातीची शिफारस केली जाते.
गोदावरी (NIAW 295) : गव्हाची ही देखील एक सुधारित जात आहे. या जातीची राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लागवड होते. हा एक प्रमुख बन्सी वाण आहे. या जातीचे पीक पेरणी केल्यानंतर 110 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होते अशी माहिती समोर आली आहे.
या जातीपासूनही शेतकऱ्यांना एकरी 18 ते 20 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. या जातीचा गहू रवा शेवया कुरडया बनवण्यासाठी उत्तम असल्याची माहिती कृषी तज्ञांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे हा वाण तांबेरा रोगास मध्यम प्रतिकारक असल्याचा दावा कृषी तज्ञांनी यावेळी केलाय.
त्रंबक (एन आय ए डब्ल्यू 301) : गव्हाचा हा एक प्रमुख सरबती वाण आहे. या जातीचा पीक परिपक्व कालावधी पाहायाचा झाला तर 115 दिवसात या जातीचे पीक तयार होते. या जातीपासूनही शेतकऱ्यांना एकरी 18 ते 20 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते.
या जातीचे दाणे हे जाड असतात, आकाराने मोठे असतात आणि या जातीच्या गव्हापासून उत्कृष्ट चपात्या तयार होतात. ही जात तांबेरा रोगास प्रतिकारक्षम असल्याचा दावा कृषी तज्ञांनी केलाय.