Soybean Crop Management : काल राज्यात मान्सूनचे आगमन झाल्याचे हवामान विभागाने घोषित केले. यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून मान्सूनची वाट पाहणाऱ्या बळीराजाच्या चेहऱ्यावर मोठे समाधान झळकत आहे. आता शेतकरी बांधव पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर पेरणीसाठी पुढे सरसावणार आहेत.
काही भागात तर मान्सूनपूर्व पेरणी देखील करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने पूर्व हंगामी कापूस लागवड झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान 80 ते 100 मिलिमीटर पाऊस पडल्यानंतर शेतकरी बांधव सोयाबीन या नगदी पिकाची देखील पेरणी सुरू करणार आहेत.
खरंतर सोयाबीन हे एक तेलबीया पीक असून यापासून शाश्वत उत्पादन शेतकऱ्यांना मिळते. मात्र सोयाबीन पेरणीनंतर शेतकऱ्यांना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. सोयाबीन पिकातून जरी शाश्वत उत्पादन मिळत असले तरी देखील गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन पिकावर पिवळा मोजॅक नावाचा रोग आढळून येत आहे.
यामुळे पीक उत्पादनात 15 ते 75% पर्यंतची भेट देखील होऊ शकते असा दावा तज्ञ लोकांनी केला आहे. अशा परिस्थितीत या रोगावर वेळीच नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे. अशा परिस्थितीत आज आपण या रोगावर कशा पद्धतीने शेतकरी नियंत्रण मिळवू शकतात याविषयी जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा :- अखेर कापूस लागवडीचा श्रीगणेशा झाला; ‘या’ आधुनिक पद्धतीने करा कापसाची लागवड, मजुरीत होणार बचत, उत्पादनात होणार मोठी वाढ
पिवळा मोजॅक रोगाची लक्षणे
या रोगाला केवडा रोग म्हणून ओळखल जात. या रोगाचा प्रसार हा पांढरी माशी या कीटकाद्वारे होतो. पिकाच्या पानाच्या मुख्य शिरांजवळ विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे तयार होतात. त्यानंतर पाने जस-जशी परिपक्व होत जातात तसतशी त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे तयार होतात.
जर या रोगाचा पिकावर प्रादुर्भाव आला तर पाने अरुंद होतात व मुरगळतात. तसेच पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत जर या केवडा रोगाचा प्रादुर्भाव झाला तर संपूर्ण पिक पिवळे पडते. या रोगाने ग्रसित झालेल्या सोयाबीनच्या झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा लागत नाहीत. लागल्यात तर कमी प्रमाणात लागतात.
फुलधारणा आणि फळधारणा व्यवस्थित होत नाही पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते. तसेच फळधारणा झाली तरीदेखील दाण्यामधील तेलाचे प्रमाण घटते. तेलाच्या प्रमाणात मोठी घट होते आणि प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते. यामुळे शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात घट होऊ नये म्हणून या रोगावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! राज्यातील मान्सून आगमनाबाबत भारतीय हवामान विभागाने दिली ‘ही’ मोठी गुड न्युज, पहा काय म्हणतंय IMD
कशा पद्धतीने करणार व्यवस्थापन
- सर्वप्रथम रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करा.
- हा रोग पांढरी माशी मुळे पसरतो यामुळे पांढरी माशी वर नियंत्रण मिळवा. यासाठी थायोमिथॉक्झाम (२५ टक्के) 2 ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारण्याचा सल्ला जाणकार लोकांनी दिला आहे.
- पांढरी माशी नियंत्रणासाठी एकरी दहा पिवळे चिकट सापळे लावा.
- खरंतर सोयाबीन पीक हे हवेतून नत्र शोषून घेत असते. म्हणून या पिकाला अधिक नत्राची गरज नसते. अनेक जण मात्र या पिकाला जास्त नत्र देतात. यामुळे देखील या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणून जास्त प्रमाणात नत्र देऊ नये. अर्थातच नत्रयुक्त खतांचा देखील कमी वापर करावा.
- बिगर हंगामी सोयाबीन लागवड करू नये.
- पांढरी माशी जर नियंत्रणात आली नाही तर दहा दिवसांनी पुन्हा एकदा दुसरी फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
- मात्र कोणत्याही औषधाची फवारणी करण्यापूर्वी तज्ञ लोकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
हे पण वाचा :- सोयाबीनची ‘या’ पद्धतीने लागवड करा आणि हमखास 15 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवा !