Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. दरम्यान हिच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शहरात मेट्रो देखील सुरू करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी यादरम्यान सध्या मेट्रो सुरू असून पुणे शहराला आणखी एका नव्या मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. मार्च 2025 अखेरपर्यंत शहरातील आणखी एका महत्त्वाच्या मार्गावर मेट्रो सुरू होणार आहे.
यामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी सुरक्षित आणि जलद होईल अशी आशा आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मेट्रो मार्ग विकसित केला जात आहे.
हिंजवडी हे पुणे शहरातील आयटी हब. या ठिकाणी अनेक मोठमोठे आयटी कंपन्या अस्तित्वात असून शहरातील मध्यवर्ती भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी कामासाठी येतात. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग याच प्रवाशांसाठी विकसित केला जात आहे.
या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2018 मध्ये करण्यात आले होते. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने हाती घेतले आहे.
यासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेइकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. हा मेट्रोमार्ग 23.2 किलोमीटर लांबीचा असून या मार्गावर एकूण 23 स्थानके विकसित होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे यातील बहुतांशी मेट्रोस्थानकांचे काम हे पूर्ण होत आले आहे.
या मेट्रो मार्गासाठी माण येथे कार डेपो तयार होत असून याचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. महत्त्वाची बाब अशी की सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर राबवला जाणारा हा देशातील पहिलाच मेट्रो मार्ग प्रकल्प आहे.
या प्रकल्पासाठी 8313 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचे आत्तापर्यंत 74 टक्के काम पूर्ण झाले आहे. महत्त्वाची बाब अशी की या प्रकल्पाचे उर्वरित काम येत्या काही महिन्यात पूर्ण होईल आणि मार्च 2025 अखेरपर्यंत हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
हा मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान चा प्रवास जलद होणार आहे. शिवाजीनगर भागातून हिंजवडी ला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना या मेट्रो मार्गाचा नक्कीच मोठा फायदा होणार आहे.