Pune Hubali Vande Bharat Train : पुणे ते हुबळी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय रेल्वेने नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखवला.
या गाडीचे उद्घाटन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दरम्यान याच वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात रेल्वे कडून लवकरच एक मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो असे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बेळगावचे राज्यसभेचे खासदार इराण्णा काडादी यांनी नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आणि पुणे-बेळगावी-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला घटप्रभा रेल्वे स्थानकावर एक मिनिट थांबा मिळावा यासाठी विनंती केली आहे.
खासदार महोदयांनी याबाबतचे निवेदन देखील केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना सुपूर्द केले आहे. विशेष बाब अशी की केंद्र रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार महोदय यांच्या या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
खासदार काडादी यांच्या विनंतीला मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. या बैठकीला केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी सुद्धा उपस्थित होते.
पुणे-बेळगावी-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन नुकतीच सुरू करण्यात आली आहे. ही गाडी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कराड या भागातील प्रमुख शहरांना जोडते.
प्रवाशांना आधुनिक आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी या ट्रेनची रचना करण्यात आली आहे. या ट्रेनमुळे पुणे ते हुबळी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास वेगवान झाला आहे. या गाडीने प्रवाशांना अगदीच आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव घेता येतोय.
दरम्यान आता या वंदे भारत ट्रेनला घटप्रभा रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. जर ही मागणी मान्य झाली तर नक्कीच या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
घटप्रभा येथे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला थांबा देण्यासाठी खासदार काडादी यांनी सुरु केलेले प्रयत्न हे या भागातील लोकांसाठी कनेक्टिव्हिटी आणि प्रवास सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल राहणार आहे.