Onion Rate : लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान बाजारात कांद्याला अपेक्षित दर मिळत नव्हता. अगदीच एक ते दोन रुपये प्रति किलो या दरात शेतकऱ्यांना आपला कांदा विकावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील त्यावेळी भरून काढता आला नाही आणि यामुळे साहजिकच सरकार विरोधात शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी सुद्धा पाहायला मिळाली.
महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांची ही नाराजी मतपेटीतून समोर आली आणि सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांनी चांगलाचं इंगा दाखवला. लोकसभा निवडणुकीत कांद्याचा प्रश्न सत्ताधाऱ्यांना चांगलाचं जड गेला होता यामुळे विधानसभा निवडणुकीच्या काळात किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने कोणताच हस्तक्षेप केला नाही.
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात कांद्याच्या किमती वधारल्या असून यामुळे गेली अनेक महिने कवडीमोल दरात कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळतं आहे. कांदा बाजार भाव गेल्या काही महिन्यांपासून तेजीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुका झाल्यात की महाराष्ट्रात कांद्याचे भाव पडतील अशा काही चर्चा गत काही दिवसांमध्ये जोर धरत होत्या. त्यामुळे खरंच निवडणुकीनंतर कांद्याच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे का, याबाबत तज्ञांनी नेमकी काय माहिती दिली आहे याचाच आता आपण आढावा घेणार आहोत.
बाजार अभ्यासाकांनी सांगितल्याप्रमाणे येत्या 10-15 दिवसांनी कांद्याच्या किमती हळूहळू कमी होऊ लागतील. तज्ञ सांगतात की, सध्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या किरकोळ बाजारात कांद्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत.
त्या ठिकाणी राजस्थानच्या अलवर येथून कांद्याची आवक होत आहे. मात्र, राजस्थानची कांदा आवक ही मागणीच्या तुलनेत कमी आहे. म्हणून वाढलेल्या भावावर त्याचा कोणताही परिणाम होत नाहीये. पण जेव्हा आपल्या महाराष्ट्रातून आणि गुजरातमधून खरीप कांद्याची आवक सुरू होईल तेव्हा कांद्याचे भाव उतरण्यास सुरुवात होणार आहे.
खरे तर राज्यातील नाशिक जिल्ह्यातून संपूर्ण देशात कांदा पाठवला जात असतो. दिल्लीमध्ये सुद्धा नाशिकचा कांदा पोहोचतो. मात्र खरीप कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने आणि खरीप कांद्याच्या लागवडी उशिराने झाल्या असल्याने नवीन कांद्याची आवक अजूनही महाराष्ट्रातील बाजारांमध्ये फारच मर्यादित आहे.
या सर्व गोष्टींचा विचार केला असता सध्या संपूर्ण देशभर कांद्याच्या किमती तेजीत आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना नक्कीच फटका बसतोय मात्र कांदा बाजारभावामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळतोय.
शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले आहे ते वाढीव बाजारभावातून भरून निघेल असे मत आता व्यक्त होत आहे. पण येत्या काही दिवसांनी नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि नवीन कांद्याची आवक वाढली की बाजार भाव देखील कमी होण्याची शक्यता आहे.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कांद्याच्या वाढलेल्या भावातून सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो असा अंदाज बाजार अभ्यासकांनी वर्तवला आहे. म्हणजेच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कांद्याच्या किमती कमी होणार आहेत.