Onion Rate : गेल्या काही दिवसापासून कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळतं आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. खरीप हंगामातील लाल कांदा देखील अतिशय कमी दरात विकला गेला आणि आता उन्हाळी हंगामातील कांदा देखील कवडीमोल दरात विकला जात आहे.
कांदा मात्र सहा ते सात रुपये प्रति किलो या दरात सध्या विक्री होत आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी बाजारात कांद्याला 350 रुपये प्रतिक्विंटल ते 1 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर सध्या मिळत आहे. सरासरी बाजारभाव मात्र 600 ते साडेसहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा आहे.
शेतकऱ्यांच्या मते, कांदा उत्पादित करण्यासाठी देखील यापेक्षा अधिक खर्च त्यांना करावा लागला आहे. यामुळे सध्या मिळत असलेल्या दरात कांदा विक्री केल्यास पिकासाठी आलेला उत्पादन खर्च देखील भरून निघणार नाही असे चित्र आहे. या परिस्थितीमुळे कांदा उत्पादक कर्जाच्या ओझ्याखाली दाबला जाण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :- राज्यातील ‘या’ विभागात पुन्हा चार दिवस पावसाचे ! तुमच्या भागात कसं राहणार हवामान? वाचा…
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या माध्यमातून कांदा दरात वाढ व्हावी म्हणून काहीतरी उपायोजना आखण्याची शासनाकडे मागणी केली जात आहे. दरम्यान, खासदार हेमंत गोडसे यांनी कांदा उत्पादकांचे हे हाल लक्षात घेऊन नाफेडने कांदा खरेदी लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी यावेळी केली.
विशेष म्हणजे नाफेडच्या माध्यमातून पुढील आठवड्यापासून कांदा खरेदी सुरू केली जाऊ शकते असं सांगितलं जात आहे. शेतकऱ्यांनी खासदार महोदय यांच्याकडे कांदा दरवाढीसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली होती.
यावर खासदार गोडसे यांनी पिंपळगाव येथील नाफेडच्या कार्यालयात जाऊन नाफेड प्रशासनाकडे लवकरात लवकर उन्हाळी कांदा खरेदी सुरू करावी अशी मागणी केली होती.
यावर नाफेड प्रशासनाने देखील सकारात्मकता दाखवली आहे आणि पुढील आठवड्यापासून कांदा खरेदी सुरू होणार असे आश्वासन दिले असल्याचे खासदार गोडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
विशेष म्हणजे नाफेडच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात तीन लाख टन एवढा कांदा खरेदी होणार असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच जर नाफेडने कांदा खरेदी सुरू केली तर याचा परिणाम दरावर होण्याची शक्यता आहे.
यामुळे कांदा व्यापारी आणि नाफेडमध्ये स्पर्धा निर्माण होईल आणि दरात वाढ होण्यास मदत होईल असं मत जाणकार व्यक्त करत आहेत. यामुळे नाफेडकडून कांदा खरेदी केव्हा सुरू होते आणि शेतकऱ्यांना केव्हा दिलासा मिळतो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.