Mumbai Railway News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई मधील रेल्वे प्रवाशांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून मुंबईवरून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे अमरावती ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आदिलाबाद ते दादर दरम्यान अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्या चालवल्या जाणार अशी माहिती सेंट्रल रेल्वेने दिली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजधानी मुंबईमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुयायांची गर्दी पाहायला मिळते.
यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईमध्ये मोठी गर्दी होणार आहे. दरम्यान प्रवाशांची होणारी हिच अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने अनारक्षित गाड्यांचे नियोजन केले आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या अनुयायांची मोठी सोय होणार आहे.
अशा परिस्थितीत आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या संदर्भातही आज आपण माहिती पाहणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक?
अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – अमरावती या अनारक्षित विशेष गाडीच्या अमरावती ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते अमरावती अशा प्रत्येकी एक म्हणजे एकूण दोन फेऱ्या होतील.
गाडी क्रमांक ०१२१८ ही विशेष ट्रेन अमरावती येथून ५ डिसेंबर रोजी १७.४५ वाजता सोडली जाणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०५.२५ वाजता पोहोचणार आहे. तसेच गाडी क्रमांक ०१२१७ ही विशेष गाडी ७ डिसेंबर रोजी ००.४० वाजता सोडली जाणार आहे आणि अमरावती येथे त्याच दिवशी १२.५० वाजता पोहोचणार आहे.
या स्थानकावर थांबा घेणार
या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कल्याण आणि दादर येथे थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सेंट्रल रेल्वेने यावेळी दिली आहे.
आदिलाबाद – दादर विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक कसे राहणार?
आदिलाबाद – दादर – आदिलाबाद अनारक्षित विशेष गाडीच्याही दोन फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०७०५८ ही विशेष ट्रेन आदिलाबाद येथून ५ डिसेंबर रोजी सकाळी ०७.०० वाजता सोडली जाणार आहे आणि दादर येथे दुसऱ्या दिवशी ३.३० वाजता पोहोचणार आहे.
तसेच, गाडी क्रमांक ०७०५७ ही विशेष ट्रेन दादर येथून दि. ७ डिसेंबर रोजी ०१.०५ वाजता सोडली जाणार आहे आणि आदिलाबाद येथे त्याच दिवशी १८.४५ वाजता पोहोचणार आहे.