Maize Farming : मका हे महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची शेतकरी बांधव दुहेरी उद्देशाने लागवड करतात. धान्य आणि चारा अशा दोन्ही उत्पादनासाठी मक्याची लागवड केली जात असते. खरीप तसेच रब्बी हंगामात मका लागवड होते.
खरीप हंगामात आपल्या महाराष्ट्रात मक्याची लागवड विशेष उल्लेखनीय असून रब्बी मध्ये देखील राज्यातील अनेक शेतकरी याची लागवड करताना दिसतात. दरम्यान याच मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.
खरंतर मका पिकातून जर विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर त्याच्या सुधारित जातींची लागवड होणे आवश्यक असते. भारतीय कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी विविध पिकांच्या जाती विकसित करतात.
कृषी शास्त्रज्ञांनी मक्याच्या देखील अनेक जाती विकसित केल्या असून अलीकडेच मक्याच्या अशा दोन नवीन जाती विकसित करण्यात आल्या आहेत ज्या की उच्च उत्पादनक्षम आहेत आणि रोगांना बळी न पडणाऱ्या आहेत.
यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिकचे उत्पादन मिळवता येणे शक्य होणार असल्याचा दावा कृषी तज्ञांकडून केला जातोय. दरम्यान आज आपण नव्याने विकसित झालेल्या याच दोन्ही जातींची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
नव्याने विकसित झालेल्या मक्याच्या सुधारित जाती
भारतीय कृषी संशोधन संस्थेने अलीकडेच DMRH 1308 आणि DMRH 1301 या दोन जाती विकसित केल्या आहेत, ज्यांच्या लागवडीतून बंपर उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. यातील डीएमआरएच 1308 ही जात रब्बी हंगामात लागवडीसाठी शिफारशीत आहे.
ही संकरित जात आहे. हा एक उच्च उत्पन्न देणारा मका वाण आहे. या जातीच्या पीक परिपक्व कालावधी बाबत बोलायचं झालं तर रब्बी हंगामात या जातीचे पीक 130 ते 150 दिवसात परिपक्व होते.
दाण्यांचा पिवळा रंग, विविध रोगांना प्रतिरोधक ही संकरित जात 7.0 ते 10.5 टन/हेक्टरी उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा तज्ञांनी केलाय. अर्थातच या जातीपासून हेक्टरी 100 क्विंटल पेक्षा अधिकचे उत्पादन मिळू शकते.
निश्चितच या जातीच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे. या जातीची देशातील अनेक प्रमुख मका उत्पादक राज्यात लागवड करता येणे शक्य आहे. DMRH 1301 ही मक्याची दुसरी जात रब्बी हंगामासाठीच शिफारशीत आहे.
ही एक मध्यम कालावधीची जात असून या जातीपासून शेतकऱ्यांना 6.5 ते 10.5 टन प्रति हेक्टरी एवढे उत्पादन मिळते असा दावा करण्यात आला आहे. म्हणजेच या जातीपासून देखील शेतकऱ्यांना हेक्टरी 100 क्विंटल पेक्षा जास्तीचे उत्पादन मिळू शकते. ही जात देखील विविध रोगांमध्ये प्रतिकारक आहे.