Maharashtra Rain Alert : रब्बी हंगाम ऐन अंतिम टप्प्यात आला असतानाच भारतीय हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या वायव्य दिशेकडून बंगालच्या उपसागरात सागराहून वारे वाहत आहेत. तसेच अरबी समुद्रातून नैऋत्येकडून वायव्य भारताच्या दिशेने सरकणारे पण उत्तर महाराष्ट्राकडे वळणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा मिलाफ होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या वातावरणीय घडामोडी होत आहेत.
परिणामी महाराष्ट्रात आज पासून आठ तारखेपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र असे असले तरी सहा मार्च ते आठ मार्च दरम्यान पावसाची अधिक शक्यता राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 6 मार्च रोजी संध्याकाळी पावसाची सुरुवात होईल आणि 8 मार्चपर्यंत हा पाऊस कायम राहील. या कालावधीमध्ये अहमदनगर, पुणे, नाशिक, खानदेश, सातारा, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशिम या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यात कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा अर्थातच कसमादे पट्टा आणि नांदगाव, येवला, नाशिक, सिन्नर, दिंडोरी या तालुक्यातही पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे या कालावधीत तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. यासोबतच वादळी वारे वाहणार आहेत. वाऱ्याचा वेग 20 ते 25 किलोमीटर प्रति तास राहणार आहे. या गारपिटीमुळे आणि वादळी वाऱ्यामुळे मात्र द्राक्ष सहितच इतर फळ पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे रब्बी पिकांचे देखील नुकसान होऊ शकते असं मत तज्ञ व्यक्त करत आहेत.
हे पण वाचा :- पुणे-मुंबई मिसिंग लींक : मोठी बातमी! ‘या’ महिन्यात होणार काम पूर्ण; एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती
हवामान विभागाच्या मते विदर्भात सहा मार्च रोजी सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. मात्र पाच मार्च रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय उत्तर कोकणात आणि औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
निश्चितच पावसाची शक्यता पाहता शेतकऱ्यांनी काढणीसाठी आलेल्या आणि काढणी झालेल्या शेती पिकांची काळजी घेणे आता गरजेचे बनले आहे. हार्वेस्टिंग आणि मळणी झालेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवणे आवश्यक आहे तसेच गारपिटीची अन पावसाची शक्यता लक्षात घेता पशुधन देखील सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक राहणार आहे.