Maharashtra Onion Rate : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. काल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले, दरम्यान मतदानानंतर आज राज्यातील अनेक बाजारांमध्ये कांदा बाजार भावात सुधारणा पाहायला मिळाली आहे. आज राज्यातील तब्बल तीन बाजारांमध्ये कांद्याला कमाल 6500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
सरासरी बाजार भाव देखील मोठ्या प्रमाणात सुधारले असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. दुसरीकडे बाजारातील अभ्यासकांनी आगामी काही आठवडे कांदा बाजारात अशीच तेजी राहील असा अंदाज यावेळी वर्तवला आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या बाजारात मिळाला कांद्याला सर्वोच्च भाव
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आजच सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक 6500 प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे.
या मार्केटमध्ये आज 293 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. येथे आज कांद्याला किमान दोन हजार कमाल 6500 आणि सरासरी 4200 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 7756 क्विंटल कांदा आवक झाली.
या लीलावात आज कांद्याला किमान 2500, सरासरी 4500 आणि कमाल 6500 प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे. याशिवाय आज कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील कांद्याला सर्वोच्च दर मिळाला आहे.
या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 6200, कमाल 6500 आणि सरासरी 6,350 असा भाव मिळाला आहे. कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 4125 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 2400 , कमाल 6400 आणि सरासरी 5400 असा विक्रमी दर मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 1125 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 3100, कमाल सहा हजार 301 आणि सरासरी पाच हजार सातशे रुपये असा भाव मिळाला आहे.