Maharashtra New Expressway : महाराष्ट्रातील सर्वाधिक अडचणीच्या आणि अवघड घाटात आता एक बोगदा बांधला जाणार आहे. यामुळे रस्ते मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. महत्त्वाचे म्हणजे अजूनही काही महामार्गांची कामे सुरू आहेत.
समृद्धी महामार्ग देखील असाच एक महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्प आहे. हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून आत्तापर्यंत या महामार्गाचे 625 km लांबीचे काम पूर्ण झाले असून पूर्ण झालेला महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला देखील करण्यात आला आहे.
या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा 520km लांबीचा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला होता. यानंतर 2023 मध्ये शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला. 2024 मध्ये भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला आणि आता येत्या काही दिवसांनी इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा शेवटचा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान याच समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यात विविध बोगदे विकसित केले जात असून कसारा घाटात देखील बोगदा तयार होणार आहे. यामुळे ठाणे ते नाशिक असा प्रवास करताना कसारा घाट लागणार नाही. जर कसारा घाटात वाहनांची कोंडी झाली तर तीन-चार तास लागतात.
मात्र समृद्धी महामार्ग पूर्णपणे कार्यान्वित झाला तर ठाणे ते नाशिक असा प्रवास करताना कसारा घाट लागणार नाही यामुळे कसारा घाटातील प्रवास अवघ्या आठ मिनिटात पूर्ण होणार आहे. समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमने हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास फक्त सव्वा तासात पूर्ण होईल.
नागपूर ते भिवंडी हा प्रवास हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर अवघ्या आठ तासात करता येणे शक्य होणार आहे. या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यात एकूण पाच बोगदे तयार करण्यात आले आहेत. इगतपुरी येथे आठ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार झाला आहे. हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा दुसऱ्या क्रमांकाचा बोगदा आहे.
याच बोगदामुळे नासिकहुन ठाण्याला आणि ठाण्यातून नाशिकला येताना कसारा घाट लागणार नाही. कसारा घाटाचे सध्याचे अंतर बारा किलोमीटर एवढे आहे. मात्र हेच 12 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी प्रवाशांना तासंतास येथे अडकून राहावे लागते.
मात्र इगतपुरी येथे तयार होत असणारा बोगदा पूर्ण झाल्यानंतर इगतपुरी ते कसारा हा प्रवास अवघ्या आठ मिनिटात पूर्ण होणार आहे. तथापि समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा नेमका वाहतुकीसाठी कधीपर्यंत सुरू होणार या संदर्भात अजून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू केला जाणार होता मात्र नियोजित वेळेत कामे पूर्ण होऊ शकली नाहीत आणि यामुळे या टप्प्याचे लोकार्पण आता लांबणीवर पडले आहे.