Maharashtra Farmer Success Story : गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतोय. नैसर्गिक संकटांमुळे शेतीमधून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये. पारंपारिक पिकांची लागवड शेतकऱ्यांना परवडत नसल्याची वास्तविकता पाहायला मिळत आहे.
मात्र नैसर्गिक आणि सुलतानी संकटांमुळे बेजार झालेल्या शेतकरी बांधवांनी गेल्या काही वर्षांमध्ये नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न केला आहे. कोकणातील सावंतवाडी येथील एका 70 वर्षीय शेतकऱ्याने शेतीमध्ये असाच एक नवीन प्रयोग राबवला आहे.
नेमळे येथील शेतकरी सीताराम राऊळ यांनी फुलपिकाच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळवून दाखवले आहे. पारंपारिक पिकांची शेती परवडत नसल्याचे लक्षात येताच सीताराम यांनी लिली लागवड सुरु केली अन एक नवा आदर्श घालून दिला आहे.
त्यांनी जवळपास एक एकर जमिनीत या फुल पिकाची लागवड केली आहे. 35 गुंठे जमिनीत लागवड केलेल्या लिली पिकातून त्यांना लाखो रुपयांची कमाई झाली आहे. हवामानाचा लहरीपणा आणि वन्य प्राण्यांचा त्रास यामुळे त्रस्त झालेल्या सिताराम यांनी लिलीची लागवड करण्याचा निर्णय घेतला.
नेमळे गावाच्या बाजूलाच नरेंद्र डोंगर असल्याने त्या जंगल क्षेत्रात असलेले वन्यप्राणी हे थेट शेती बागायतीत शिरून शेतीचे नुकसान करतात. त्यामुळे येथील शेतकरी नेहमीच अर्थिक विवंचनेत दिसून येतात. वन्य प्राण्यांमुळे येथील शेतकऱ्यांना शेती मधून चांगले उत्पादन मिळत नाही.
हीच बाब लक्षात घेऊन सिताराम यांनी 2018 पासून लिली लागवड सुरू केली. सिताराम यांना नवनवीन प्रयोगाची आवड आहे, या आवडीमधूनच त्यांनी लिली लागवड केली. त्यांनी या फूल पिकाला वन्यप्राण्यांकडून नुकसान होते का, याचाही शोध घेतला. त्यानंतर लिली लागवडीचा निर्णय घेतला आहे.
सिताराम यांनी आपल्या आंबा बागेच्या आठ गुंठे जमिनीत 2018 मध्ये पहिल्यांदा लिली लागवड केली. या पिकाचे कंद त्यांनी निरवडे येथून मागवलेत. आंतरपीक म्हणून लागवड केलेल्या लिली पिकातून त्यांना पहिल्याच वर्षी चांगली कमाई झाली. या पिकाच्या लागवडीनंतर दीड-दोन महिन्यांतच उत्पादनाला सुरुवात होते.
लिलीच्या फुलांना आज गोव्यासह अन्य भागात मोठी मागणी आहे. यामुळे त्यांनी 35 गुंठे जमिनीत लिलीची लागवड केली आहे. सीताराम सकाळी उठून लिलीची फुले काढून बाजारपेठेत विक्री करत आहेत, यातून त्यांना दररोज पैसे मिळतात. नक्कीच सिताराम यांचा हा प्रयोग इतर नवयुवक तरुण शेतकऱ्यांसाठी देखील मोठा मार्गदर्शक ठरणार आहे.