Farmer Success Story : महाराष्ट्रातील कोकण आणि विदर्भ या दोन विभागात भाताची मोठ्या प्रमाणात शेती होते. राज्यातील धान लागवड ही विशेष उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये धानाची अर्थातच भाताची लागवड होते. या पिकावर राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र राज्यातील भात उत्पादक शेतकरी गतकाही वर्षांपासून संकटात आले आहेत.
एकतर महाराष्ट्रातील ज्या भागांमध्ये भात लागवड होते त्या ठिकाणची भूजल पातळी सातत्याने कमी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाईलाज म्हणून दुसऱ्या पिकांकडे वळावे लागत आहे. दुसरे म्हणजे धानाला अपेक्षित भावही मिळत नाही. सरकारकडून बोनस दिला जातो मात्र बोनसची रक्कम ही अनेकांना मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून होत आहे.
दरम्यान अशा या साऱ्या परिस्थितीमध्येच उरण तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने भात लागवडीमध्ये विक्रमी उत्पादन मिळवत इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक असे काम केले आहे. उरणमधील चिरनेरचे संतोष बाळकृष्ण चिर्लेकर या शेतकऱ्याने बासमती तांदळाची यशस्वी लागवड केली आहे.
खरे तर संतोष यांनी आधी कधीच बासमती तांदळाची लागवड केलेली नव्हती. पहिल्यांदाच त्यांनी बासमती तांदूळ लागवड करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदाच बासमतीची रोवणी केली तरीही त्यांना विक्रमी उत्पादन मिळाले आहे. एका एकर मध्ये संतोष चिर्लेकर यांनी तब्बल दोन खंडी दोन मण एवढे विक्रमी उत्पादन घेतले आहे.
फक्त एक एकर जमिनीमधून त्यांना जवळपास 1700 किलो एवढे बासमती तांदळाचे उत्पादन मिळाले आहे. यामुळे सध्या संतोष यांचा हा प्रयोग पंचक्रोशीत मोठा चर्चेचा विषय ठरत असून सध्या त्यांच्या शिवारात बासमतीचा सुवास दरवळू लागला आहे. परिसरातील अनेक शेतकरी त्यांच्या शेतजमिनीवर हजेरी लावत आहेत.
संतोष सांगतात की आधी ते पारंपारिक भाताची लागवड करत आणि यातून त्यांना फक्त 15 ते 16 मण भाताचे उत्पादन मिळत असे. मात्र यंदा त्यांनी बासमतीचा प्रयोग केला आणि यातून त्यांना चांगले विक्रमी उत्पादन मिळाले आहे.
कोणतीही शास्त्रीय माहिती नसताना त्यांनी भरघोस बासमती पिकाचे उत्पादन घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. चिर्लेकर यांच्या या बासमतीच्या प्रयोगामुळे उरणमधील शेतीला चालना देण्यासाठी आशेचा किरण ठरणार असा विश्वास देखील येथील जाणकार लोकांनी व्यक्त केला आहे.
संतोष यांनी सांगितल्याप्रमाणे यंदा बासमती लागवडीचा निर्णय झाला आणि बासमती धान लागवड करण्यासाठी त्यांनी पनवेल येथील बियाणा केंद्रातून बासमती मध्मती प्रकारचे बियाणे खरेदी केले. बियाणे खरेदी केल्यानंतर त्यांनी त्याची पेरणी केली.
मग, रोपे तयार झाल्यानंतर लावणीपूर्वी त्यांनी चिखलावर १८-१८-१० हे खत फवारले त्यानंतर पिक तयार होण्याच्या बेतात असताना एक वेळ युरीया खताची मात्रा दिली. त्यामुळे या पिकाचे भरघोस उत्पादन आले. मात्र हे पिक लांब तृणाचे असल्यामुळे आणि उशिरापर्यंत पाऊस पडल्यामुळे हे पिक आडवे पडले होते.
तरी सुद्धा संतोष चिर्लेकर यांना तब्बल ४२ मण म्हणजे जवळ जवळ १७०० किलो भाताचे उत्पादन निघाले आहे. जर पीक आडवे पडले नसते तर कदाचित उत्पादनात आणखी भरीव वाढ झाली असती असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.