Farmer Success Story : गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळतं नाहीये. विविध नैसर्गिक संकटांमुळे आणि सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांचे आयुष्य खडतर बनले आहे. शेतीमधून मिळणारे उत्पादन आणि उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत असून यामुळे शेतकरी बांधव कर्जबाजारी होत चालले आहेत.
मात्र या अशा अवघड काळातही असे काही प्रयोगशील शेतकरी आहेत जे की शेती मधून लाखोंची कमाई करत आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी-भटकळवाडी येथील अशोक रासकर हे देखील असेच एक प्रयोगशील शेतकरी आहेत.
रासकर यांना अवघ्या एक एकर जमिनीतून जवळपास साडेसात लाख रुपयांची कमाई होणार आहे. यामुळे सध्या त्यांची पंचक्रोशीत फारच चर्चा सुरु आहे. रासकर यांनी सांगितल्याप्रमाणे, ते त्यांच्या वडिलोपार्जित शेतीत आधी द्राक्ष शेती करत.
मात्र, द्राक्षाच्या शेतीमधून त्यांना अपेक्षित कमाई होत नव्हती. यामुळे त्यांनी द्राक्ष लागवड बंद केली. महत्वाचे म्हणजे द्राक्ष पिकासाठी जे स्ट्रक्चर अर्थातच मांडव तयार करण्यात आलेला होता त्या मांडवावर वेलवर्गीय भाजीपाला पिकांच्या शेतीचा निर्णय घेतला.
यानुसार त्यांनी दुधी भोपळ्याची लागवड केली. यासाठी सुरुवातीला त्यांनी याचे बियाणे खरेदी केले आणि त्यापासून रोपे तयार केलीत. बियाणे दर्जेदार असल्याने रोपेही चांगली दर्जेदार तयार झालीत. तसेच दुधी भोपळ्याची लागवड करण्यासाठी बेड तयार केलेत.
बेड तयार केल्यानंतर त्यांनी बेडमध्ये शेणखत, गांडूळखत, निंबोळी पेंड, कृषीअमृत ही खते टाकलीत. मग, मल्चिंग पेपर अंथरून त्यावर रोपांची लागवड करण्यात आली. या पिकाला पाणी देण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला.
रोपांची लागवड 6 फूट बाय तीन फूट अंतरावर केली. या रोपांची लागवड केल्यानंतर साधारणता 50 दिवसांमध्ये दुधी भोपळ्याची हार्वेस्टिंग सुरू झाली. आतापर्यंत या पिकाचे सहा ते सात तोडे काढून झाले आहेत.
त्यातून त्यांना पाच ते सहा टन माल मिळाला आहे. बत्तीस रुपये प्रति किलो या दराने या दुधी भोपळ्याची त्यांनी विक्री केली आहे. विशेष म्हणजे यातून त्यांना जवळपास 25 टन पर्यंतचे उत्पादन मिळणार अशी आशा आहे.
जर त्यांना या उत्पादित झालेल्या मालाला 25 रुपये प्रति किलो असाही भाव मिळाला तरीही साडेसात लाख रुपयांपर्यंतची कमाई होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या पिकासाठी त्यांनी जवळपास दीड लाख रुपयांचा खर्च केला आहे.
म्हणजेच खर्च वजा जाता त्यांना सहा लाख रुपयांची कमाई यातून होणार आहे. अर्थातच एक एकर जमिनीतून त्यांना चार महिन्यांच्या कालावधीतच सहा लाख रुपयांपर्यंतचा निव्वळ नफा मिळणार आहे.