Farmer Success Story : शेतीचा व्यवसाय हा गेल्या काही वर्षांमध्ये मोठा आव्हानात्मक बनला आहे. दुष्काळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, ढगाळ हवामान अशा असंख्य संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून फारसे उत्पादन मिळत नाहीये. जर समजा या साऱ्या नैसर्गिक संकटांचा सामना करून शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन मिळवले तर बाजारात मालाला चांगला भाव मिळत नाही.
यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत आहे. एकीकडे पीक उत्पादनाचा खर्च वाढत आहे तर दुसरीकडे उत्पन्न कमी होत चालले आहे. यामुळे शेतकरीराजा पूर्णपणे हतबल झाला आहे. सध्या बाजारात सोयाबीन, कापूस, कांदा अशा सर्वच पिकांना अपेक्षित बाजारभाव मिळत नाहीये.
भाजीपाल्याचे देखील भाव पडले आहेत. मात्र अशा या परिस्थितीत देखील काही शेतकऱ्यांनी शेतीमधून चांगले उत्पन्न मिळवून दाखवले आहे. सध्या वांग्याला देखील बाजारात चांगला भाव मिळतं नसल्याचे चित्र आहे.
त्यामुळे वांग्याची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. वांग्याचे बाजार भाव गेल्या तीन महिन्यांपासून दबावात असून यामुळे शेतकऱ्यांची मोठी कोंडी होत आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने वांग्याला अपेक्षित असा दर मिळाला नसल्याने एक नामी शक्कल लढवली आहे.
यामुळे या शेतकऱ्याला अवघ्या दहा गुंठे जमीनीतून 80 हजार रुपयांचा नफा मिळाला आहे. म्हणून या नांदेड मधील शेतकऱ्याची सध्या मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील कंधार तालुक्याचे मौजे राहाटी येथील प्रयोगशील शेतकरी शंकर कौसले यांनी ही किमया साधली आहे.
शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी डिसेंबर 2023 मध्ये वांग्याची लागवड केली. खरे तर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वांग्याला चांगला भाव मिळत होता. यामुळे ज्यावेळी शंकर यांनी वांग्याची लागवड केली त्यावेळी त्यांना यातून चांगली कमाई होणार अशी आशा होती.
मात्र डिसेंबर नंतर वांग्याचे बाजारभाव सातत्याने घसरत गेलेत. विशेष म्हणजे अजूनही वांग्याचे भाव तीन ते सहा हजार रुपये दरम्यान रेंगाळलेले पाहायला मिळतं आहेत.
यामुळे दहा गुंठ्यात लागवड केलेल्या 1000 रोपांमधून विक्रमी उत्पादन मिळवलेले असतानाही त्यांना वांग्याच्या पिकातून पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येणार नव्हता.
त्यामुळे मग त्यांनी वांग्याची थेट विक्री करण्याऐवजी त्यापासून बियाणे तयार करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांना या दहा गुंठे शेत जमिनीतून तब्बल एक क्विंटल वांग्याचे बियाणे मिळणार आहे.
या बियाण्यातून त्यांना जवळपास 95 हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. वांगी लागवड करण्यासाठी त्यांनी 15 हजार रुपयांचा खर्च केला आहे. म्हणजेच खर्च वजा जाता त्यांना दहा गुंठ्यातून 80 हजार रुपयांचा नेट प्रॉफिट मिळणार आहे.