Farmer Success Story : महाराष्ट्रासहित संपूर्ण भारताचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. यामुळे देशाला शेतीप्रधान देशाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र, शेतीमधून शेतकऱ्यांना अपेक्षित कमाई होत नसल्याने शेतकऱ्यांचा मोठा हिरमोड होतो. अनेकदा शेतकऱ्यांना शेती पिकांसाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नाही.
यामुळे शेतकरी बांधव कर्जबाजारी होतात. कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकरी मृत्यूला कवटाळतात. महाराष्ट्रात तर शेतकरी आत्महत्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे. मात्र अशा या अडचणीच्या काळातही काही शेतकरी बांधव शेती मधून लाखो रुपयांची कमाई करून दाखवत आहेत.
आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागतेय. मात्र या नुकसानीच्या काळातही अनेक तरुण शेतकऱ्यांनी आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून शेतीमधून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे.
दरम्यान मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने अवघ्या चार महिन्यांच्या काळात दहा लाखांची कमाई काढली आहे. तालुक्यातील पाटसांगवी गावातील बाळासाहेब नाईककिंदे या तरुणाने ही किमया साधली आहे.
खरंतर, बाळासाहेब हे एमपीएससी ची तयारी करत होते. मात्र एमपीएससी परीक्षेत त्यांना अपयश आले. मात्र ते खचले नाहीत आणि शेती व्यवसाय सुरू केला. शेती व्यवसायात या तरुणाने नेत्रदीपक अशी कामगिरी करत शिमला मिरचीच्या शेतीतून लाखो रुपयांची कमाई काढली आहे.
बाळासाहेब यांनी आपले भाऊ वैभव यांच्या साथीने शिमला मिरचीच्या शेतीतून आर्थिक प्रगती साधली आहे. बाळासाहेब हे 2008 पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते. त्यांनी काही वर्ष या परीक्षांचा अभ्यास केला मात्र त्यांना यश आले नाही.
दुसरीकडे गावी त्यांचा भाऊ आणि आई वडील शेतीमध्ये मेहनत घेत होते. यामुळे बाळासाहेबांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सोडला आणि शेतीचा निर्णय घेतला. त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली.
पहिल्याच वर्षी त्यांनी आधुनिक पद्धतीने शिमला मिरचीची लागवड केली आणि यातून त्यांना दहा लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. बाळासाहेब यांनी अडीच एकर क्षेत्रावर पेरूची बाग लावलेली आहे आणि तीन एकर जमिनीत शिमला मिरचीची लागवड केलेली आहे.
जुलैमध्ये त्यांनी शिमला मिरचीची लागवड केली होती. यातून त्यांना आत्तापर्यंत सहा लाखांची कमाई झाली असून आणखी चार ते पाच लाख रुपये सहज मिळतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
अर्थातच सिमला मिरचीच्या शेतीमधून त्यांना चार ते पाच महिन्यांच्या काळात दहा लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे. यामुळे सध्या बाळासाहेबांची पंचक्रोशीत जोरदार चर्चा सुरू आहे. बाळासाहेब यांना शेतीमध्ये त्यांचे बंधू वैभव आणि आई-वडिलांची मोलाची साथ मिळाली आहे.