Cotton Farming : राज्यात खरीप हंगामाला सुरवात झाली आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मका या पिकाच्या पेरणीसाठी जमिनीची मशागत कम्प्लीट झाली आहे. विशेष बाब म्हणजे कापूस उत्पादनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखल्या जाणाऱ्यां खानदेश विभागात कापूस पेरणीला सुरुवात देखील झाली आहे.
खानदेशात विशेषतः जळगाव जिल्ह्यात काही भागांमध्ये शेतकऱ्यांनी पूर्व मोसमी कापूस लागवड करण्यास सुरुवात केली आहे. मात्र अशातच कृषी विभागाने शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा सल्ला जारी केला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी यंदा पीक पेरणीसाठी घाई करू नये.
कापूस उत्पादकांनी किमान 75 ते 100 मीमी पाऊस झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात केली पाहिजे असं कृषी विभागाने यावेळी स्पष्ट केल आहे. जळगाव जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी शेतकऱ्यांना पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर कापसाची लागवड करावी असा सल्ला दिला आहे.
तसेच एखाद्या ठराविक कंपनीचा कापूस वाणाचा आग्रह न धरता आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार, मगदूराप्रमाणे बाजारात उपलब्ध असलेल्या सुधारित कापूस वाणाची लागवड करावी असे देखील ठाकूर यांनी यावेळी नमूद केले आहे.
हे पण वाचा :- म्हशीच्या अधिक दूध उत्पादन देणाऱ्या टॉप चार जाती आणि त्यांच्या विशेषता, वाचा….
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध झाले पुरेसे कापूस बियाणे
जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनासाठी आणि कापसाच्या उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. जिल्ह्याला कापसाचे आगार म्हणून देखील ओळखतात. मराठवाडा आणि विदर्भात ज्या पद्धतीने कापूस हे एक मुख्य पीक आहे तसेच खानदेशातील जळगाव जिल्ह्यात देखील कपाशी हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे.
जिल्ह्यात जवळपास 5.50 लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशी पिकाची लागवड होते. यंदा 27.50 लाख कापूस बियाणे पाकटांची आवश्यकता भासणार असून एवढे बियाणे जिल्ह्यासाठी उपलब्ध झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात योग्य प्रमाणात युरीया, डिएपी, एमओपी, एसएसपी व संयुक्त खतांचा साठा उपलब्ध झाला आहे. म्हणून यावर्षी खतांचा तुटवडा जाणवणार नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच कापूस बियाणे, खते जादा दराने व बिना बिलाने खरेदी करु नये असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
हे पण वाचा :- कांदा कडाडला….! बांगलादेशमध्ये निर्यात सुरू होताच कांदा दरात झाली मोठी वाढ; ‘या’ बाजारात मिळाला 2200 चा भाव
ज्यादा दराने कृषी निविष्ठांची विक्री होत असल्यास या नंबरवर करा तक्रार
जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. संभाजी ठाकूर यांनी सांगितले की, जिल्ह्यात कुणीही, कुठेही कृषि निविष्ठाची जादा दराने विक्री करत असेल तर शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या ०२५७-२२३९०५४ या दुरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवायची आहे किंवा ८९८३८३९४६८ या मोबाईल क्रमांकावर देखील शेतकरी बांधव ही तक्रार नोंदवू शकतात, अशा अनुचित प्रकाराची माहिती देऊ शकतात.
हे पण वाचा :- अहमदनगरच्या शेतकऱ्यांचा नाद नाही करायचा ! सफरचंद लागवडीचा प्रयोग ठरला यशस्वी, कोणत्या जातीची केली लागवड? पहा….