Buffalo Rearing : देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून शेती सोबतच शेतीपूरक व्यवसाय करण्याचा सल्ला दिला जातो. विशेष बाब म्हणजे गेल्या काही वर्षांपासून शेतीपूरक व्यवसायात वाढही झाली आहे.
यासाठी शासनाने देखील पुढाकार घेतला असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ व्हावी म्हणून शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत पुरवली जात आहे. दरम्यान, शासनाकडून मदत मिळवत तसेच तज्ञ लोकांच्या सल्ल्याने शेतकरी बांधव आता विविध शेती पूरक व्यवसाय करू लागले आहेत.
शेतमालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने तयार करत आहेत, तसेच पशुपालन हा व्यवसाय देखील शेती पूरक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात करत आहेत. पशुपालन हा व्यवसाय प्रामुख्याने दुग्धउत्पादनासाठी केला जात असून म्हशींचे संगोपन यामध्ये सर्वाधिक होते. वास्तविक पशुपालन हा व्यवसाय फार पूर्वीपासून केला जात आहे.
हे पण वाचा :- कांदा कडाडला….! बांगलादेशमध्ये निर्यात सुरू होताच कांदा दरात झाली मोठी वाढ; ‘या’ बाजारात मिळाला 2200 चा भाव
मात्र आता या व्यवसायाची व्याप्ती वाढली असून व्यावसायिक स्तरावर हा व्यवसाय केला जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी तर शेती फक्त नावापुरती ठेवली असून पशुपालन हा मुख्य व्यवसाय म्हणून केला जात आहे.
खरंतर पशुपालन व्यवसाय हा दुग्ध उत्पादनासाठी केला जातो, यामुळे या व्यवसायातून अधिकचे दूध उत्पादन मिळवण्यासाठी अधिक दूध उत्पादनक्षमता असलेल्या पशुच्या जातींची निवड करणे जरुरीचे ठरते. अशा परिस्थितीत आज आपण सर्वाधिक दूध देणाऱ्या देशातील टॉप चार म्हशीच्या जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
म्हशीच्या सर्वोत्कृष्ट जाती कोणत्या?
मुर्राह म्हैस :- ही देशात आढळणारी एक सर्वोत्कृष्ट म्हशीची जात आहे. ही जात दूध उत्पादनासाठी विशेष ओळखली जाते. या जातीचे संगोपन हरियाणा आणि पंजाब या दोन राज्यात सर्वाधिक केले जात आहे. आपल्या राज्यातही या जातींचे संगोपन मोठ्या प्रमाणात होते. राज्यातील पशुपालक या जातीच्या संगोपनातून चांगले दूध उत्पादन मिळवत असून यातून त्यांना चांगली उत्पन्न मिळत आहे. असं सांगितलं जातं की, या जातीची म्हैस रोजाना 20 ते 30 लिटरपर्यंत दूध देण्यास सक्षम असते. या जातीच्या म्हशीच्या दुधात सात टक्के एवढा फॅट आहे. यामुळे या जातीच्या म्हशीच्या दुधाला बाजारात चांगला दर प्राप्त होतो. साहजिकच या जातीचे संगोपन करून शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळवता येणार आहे.
हे पण वाचा :- अहमदनगरच्या शेतकऱ्यांचा नाद नाही करायचा ! सफरचंद लागवडीचा प्रयोग ठरला यशस्वी, कोणत्या जातीची केली लागवड? पहा….
जाफ्राबादी म्हैस :- ही देखील मुर्राह जातीच्या म्हशीसारखीच उच्च दूध उत्पादन क्षमता असलेली म्हैस आहे. या जातीच्या म्हशीचे तोंड लहान आणि शिंगे वक्र असतात. ही म्हैस काळी आणि त्वचा सैल असते. या जातीच्या म्हशीच्या कपाळावर हमखास पांढरे निशाण तुम्हाला पाहायला मिळू शकते. हे पांढरे निशाणच या जातीची ओळख आहे असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. ही म्हैस खूपच वजनदार असते. या म्हशीचे वजन 800 किलो ते 1 टन पर्यंत असते असा दावा केला जातो. या जातीची म्हैस एका दिवसाला 30 लिटरपर्यंत दूध देण्यास सक्षम आहे.
भदावरी म्हैस :- मुरा आणि जाफराबादी म्हशीच्या तुलनेत या जातीची म्हैस खूपच कमी प्रमाणात दूध देते. मात्र इतर देशी जातीच्या तुलनेत या जातीची दूध उत्पादन क्षमता देखील चांगली आहे. ही जात एका दिवसाला सात ते आठ लिटरपर्यंत दूध देण्यास सक्षम असते. मात्र जर या जातीच्या म्हशीची चांगली निगा ठेवली तर दहा लिटर पर्यंत देखील दूध देतात असा दावा काही शेतकरी करत आहेत. ही एक मध्यम आकाराची जात आहे. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे उष्ण हवामानात देखील या जातीची म्हैस तग धरू शकते आणि चांगले दूध उत्पादन देण्यास सक्षम आहे.
सुरती म्हैस :- ही जात देखील भदावरी म्हशीप्रमाणेच दूध देण्यास सक्षम आहे. असं सांगितलं जातं की या जातीच्या म्हशीसाठी आहारावर खूपच कमी खर्च करावा लागतो. कमी आहारात देखील या जाती चांगल्या दूध देतात. म्हशीची ही जात एका वेतात 900 ते तेराशे लिटरपर्यंत दूध देण्यास सक्षम असते. या जातीचे संगोपन देशातील अनेक राज्यात केले जात आहे. पशुपालक शेतकऱ्यांमध्ये ही देखील जात विशेष लोकप्रिय ठरली आहे.
हे पण वाचा :- पांढरं सोन हंगामाचा शेवट करणार गोड ! कापसाच्या दरात झाली तब्बल सातशे रुपयांची वाढ, ‘या’ बाजारात झाली दरवाढ