Apple Farming In Marathwada : सफरचंद शेती म्हटलं की सर्वप्रथम आपण विचार करतो तो जम्मू कश्मीर आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांचा. सफरचंद शेतीमध्ये या दोन राज्यांची मक्तेदारी आतापर्यंत राहिली आहे.
मात्र लवकरच ही मक्तेदारी संपुष्टात येऊन इतर मैदानी भागात देखील सफरचंद शेती आपणास पाहायला मिळू शकते. आपल्या महाराष्ट्रात देखील सफरचंद लागवड आता पाय पसरू लागली आहे.
महाराष्ट्रातील बहुतांशी प्रयोगशील शेतकऱ्यांनी आता प्रायोगिक तत्त्वावर सफरचंद लागवड करण्यास सुरवात केली आहे. विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी सफरचंद शेतीतून चांगले उत्पन्न देखील मिळवून दाखवले आहे.
मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्यानें देखील सफरचंद शेती मधून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. कृषी तज्ञांच्या मते सफरचंद हे पीक थंड हवामानात उत्पादित होते. आपणही असंच म्हणतो. या पिकासाठी थंड हवामान अतिशय अनुकूल असते.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी; कापसाच्या ‘या’ वाणाची लागवड करा, 30 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवा
मात्र आता कृषी शास्त्रज्ञांनी अशा देखील काही जाती विकसित केल्या आहेत ज्या कमी थंड हवामानात किंवा उष्ण प्रदेशात देखील उत्पादित होऊ शकतात. अण्णा आणि हरिमन या दोन सफरचंद जाती अशाच आहेत. या जाती उष्ण हवामानात देखील उत्पादित होतात.
हीच बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील हसनाबाद येथील प्रयोगशील शेतकरी मनोज बद्रीनारायण लाठी यांनी या दोन जाती लावून सफरचंद शेती सुरु केली आहे. मनोज यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी 2019 मध्ये युट्युब वरून माहिती घेत सफरचंद शेती सुरू केली.
त्यांनी 400 सफरचंद रोपांची लागवड केली. पाण्यासाठी ठिबक लावली. सर्वप्रथम त्यांनाच आपल्याकडे सफरचंद यशस्वीरित्या उत्पादित होतील याबाबत शंका होती.
मात्र सफरचंदाची आपल्या दोन एकर पडीक जमिनीवर लागवड केल्यानंतर त्यांनी पिकाची योग्य पद्धतीने काळजी घेतली. तज्ञ लोकांच्या सल्ल्याने या पिकासाठी खत व्यवस्थापनाचे आणि पाणी व्यवस्थापनाचे नियोजन केले.
विशेष म्हणजे त्यांनी रासायनिक खतांचा अगदी कमी प्रमाणात वापर करून गांडूळ खत, गोबर गॅस सॅलरी, शेणखत, चुना, जीवामृत इत्यादीं सेंद्रिय खतांचा आणि औषधांचा वापर करत सफरचंद शेती यशस्वी केली आहे. गेल्यावर्षी म्हणजेच 2022 मध्ये त्यांना सफरचंद शेती मधून दोन लाखांची कमाई झाली.
यंदा मात्र कमाईचा आकडा वाढणार असून दोन एकरात चार लाखापर्यंतची कमाई होण्याची आशा त्यांना आहे.जुलै मध्ये सफरचंद शेती मधून त्यांना उत्पादन मिळणार असून यंदा किमान 4 लाखापर्यंत कमाई होईल असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
निश्चितच जम्मू कश्मीर आणि हिमाचल प्रदेश यांसारख्या थंड हवामानात वाढणार हे पीक मराठवाड्यासारख्या उष्ण हवामानात यशस्वीरित्या उत्पादित करून लाखो रुपयांची कमाई करत मनोज यांनी इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केलं आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान ! यंदा कापूस लागवड करतांना ‘ही’ काळजी घ्या, नाहीतर….