Ahmednagar Successful Farmer : शेती म्हटलं की अनेकजण नाक मुरडतात. विशेष म्हणजे आता शेतकरी पुत्रांना देखील शेतीमध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही. शेती म्हणजे केवळ तोट्याचा व्यवसाय अशी धारणा आता बनली आहे. शेती क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन एवढा खालावला आहे की आता तरुण लग्नाळू शेतकऱ्यांना लग्नासाठी मुली देखील कोणी देत नाही.
निश्चितच ही एक चिंताजनक बाब आहे. खरं पाहता गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीमधून मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे. पारंपारिक पद्धतीने शेती केली तर शेतीमधून फारसे उत्पन्न मिळत नाही. परंतु जर आधुनिक पद्धतीने शेती केली तर शेती व्यवसायातून देखील लाखोंची कमाई शेतकऱ्यांना होत आहे. याची अनेक उदाहरणे समोर देखील येतात.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातून असाच एक साजेसं उदाहरण समोर आल आहे. जिल्ह्यातील एका सुशिक्षित तरुणाने नोकरी ऐवजी शेती व्यवसायात आपलं भविष्य घडवलं आहे. इंजीनियरिंग शिक्षण घेतलेला असतानाही नोकरी नाही करायची असा निर्णय घेत शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून या तरुणाने लाखो रुपयांची कमाई केली आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ कारणामुळे कांदा दरात वाढ होणार; किती वाढणार भाव, जाणकार लोकांचा अंदाज वाचा…
जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या मौजे कऱ्हेटाकळी येथील दीपक अर्जुन लेंडाळ या तरुणाने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी मागे न धावता वडीलोपार्जित शेतीमध्ये आपलं नशीब आजमावलं. त्याने आपल्या वडिलोपार्जित दीड एकर जमिनीत आधुनिक पद्धतीने टोमॅटोची लागवड केली असून यातून त्याला लाखो रुपयांची कमाई होणार आहे.
या दीड एकरातून त्याला जवळपास सहा ते सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. म्हणून सध्या या इंजिनिअर तरुणाचा शेतीमधला हा प्रयोग पंचक्रोशीत चांगलाच चर्चेत आला आहे. दीपक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शेती व्यवसायात वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळ्या नगदी पिकांचे शेती करत आहेत. त्यांनी शिक्षणानंतर नोकरी करावी अशी घरच्यांची इच्छा होती.
मात्र मातीशी नाळ जुळलेले दीपक आधीपासूनच नोकरी करण्याच्या पक्षात नव्हते. त्यांना आधीपासूनच नोकरीमध्ये इंटरेस्ट नव्हता, त्यांना शेतीच करायची होती. यामुळे त्यांनी शिक्षणासोबतच शेती व्यवसाय देखील सुरूच ठेवला होता. म्हणून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री मिळवल्यानंतर त्यांनी नोकरी न करता शेती केली आहे.
हे पण वाचा :- राज्यातील ‘या’ विभागात पुन्हा चार दिवस पावसाचे ! तुमच्या भागात कसं राहणार हवामान? वाचा…
यावर्षी त्यांनी दीड एकर जमिनीत टोमॅटो पिकाची लागवड केली आहे. या पिकाची लागवड करण्यासाठी सर्वप्रथम नागरणी केली नंतर रोटावेटर मारून बेड तयार केले. पाच फूट अंतराचे बेड तयार झाले त्यावर शेणखत आणि रासायनिक खतांची मात्रा टाकण्यात आली.
मग नंतर मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचन प्रणाली बसवली. मग सिजेंटा कंपनीचे टोमॅटो वाण त्यांनी लावले. मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात टोमॅटो पिकाची लागवड करण्यात आली. पिकाची लागवड झाल्यानंतर तज्ञांच्या सल्ल्याने कीटकनाशकांची आणि बुरशीनाशकांची फवारणी त्यांनी केली.
पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे पीक चांगले बहरले. टोमॅटो पिकाला बांबूचा आधार दिला. टोमॅटो लागवड केल्यापासून ते पर्यंत साधारणता दोन ते अडीच लाखांचा खर्च त्यांना आला. यापासून आता त्यांना उत्पादन मिळत असून रोजाना 100 ते 200 कॅरेट टोमॅटो विक्रीसाठी जात आहे.
दीपक सांगतात की या टोमॅटो पिकातून त्यांना 40 ते 50 टन माल मिळणार आहे अर्थातच सहा ते सात लाखांचे उत्पन्न यातून त्यांना मिळण्याची आशा आहे. निश्चितच दीपक यांनी शेतीमध्ये केलेला हा प्रयोग नेत्रदीपक असून यामुळे इतरांना प्रेरणा मिळणार आहे यात तीळमात्र देखील शंका नाही.