Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता दोन दिवसांचा काळ उलटला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर कांद्याचे बाजार भाव पडतील की काय अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात होती. मात्र सध्या तरी कांद्याचे दर तेजीतच आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय.
काल, रविवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याच्या तिसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला विक्रमी भाव मिळालाय. या बाजारात रविवारी झालेल्या लिलावात एक नंबर कांद्याला उच्चांकी दर मिळालाय.
या बाजारात झालेल्या लिलावात एक नंबरच्या कांद्याला साडेपाच हजाराची बोली लागली. या उपबाजाराच्या आवारात 1540 गोण्यांची विक्रमी आवक झाली होती अन आवक वाढलेली असतानाही या बाजारात कांद्याला समाधानकारक भाव मिळाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये अगदीच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
बाजार समिती प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी एक नंबर कांद्याला साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल, दोन नंबर कांदा तीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटल, तीन नंबर कांदा दोन ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल अन चार नंबर कांदा एक ते दोन हजार रुपये क्विंटल दराने विकला गेलाय.
बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे, सचिव बाळासाहेब बोरुडे यांनी ही माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कांद्याला कसे दर मिळणार, कांदा बाजार भाव तेजीत राहणार का? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होते.
दरम्यान आता निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरही कांद्याचे दर तेजीत असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
विशेष बाब अशी की लाल कांद्याची आवक अजूनही मर्यादित असल्याने आगामी काही दिवस कांदा बाजार भावातील ही तेजी अशीच टिकून राहणार अशी ही माहिती काही बाजार अभ्यासकांच्या माध्यमातून यावेळी देण्यात आली आहे.
यामुळे आता पुढील काय आठवले तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत राहणार आहे. जेव्हा बाजारात कांद्याची आवक वाढेल तेव्हाच बाजार भाव कमी होण्याची शक्यता आहे.