Women Successful Farmer : भारत हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र आपल्या देशात आजही शेती व्यवसायात पुरुषप्रधान संस्कृती हावी आहे. शेतीमध्ये पुरुषांची मक्तेदारी आजही अधिक असल्याचे पाहायला मिळते. परंतु आता परिस्थिती बदलू लागली आहे.
आता महिला इतर क्षेत्राप्रमाणेच शेती क्षेत्रात ही चांगली कामगिरी करत आहेत. शेतीमधून महिलांनी आता लाखो, करोडो रुपयांचे उत्पन्न कमवून दाखवले आहे. महिला शेतकरी आता नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक असे काम करत आहेत.
दरम्यान नासिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातूनही असेच एक उत्तम आणि साजेसे उदाहरण समोर आले आहे. तालुक्यातील एका महिला शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीतून मात्र साडेतीन लाख रुपयांचा खर्च करून 15 लाखांचे उत्पन्न कमवून दाखवले आहे. येवला तालुक्यातील मौजे रायते येथील सरलाताई चव्हाण यांनी ही किमया साधली आहे.
यामुळे सध्या सरलाताईंची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा पाहायला मिळत आहे. सरला ताईंनी सांगितल्याप्रमाणे, ते चार वर्षांपूर्वी इतर शेतकऱ्यांप्रमाणेच पारंपारिक शेती करायचे. कांदा, टोमॅटो, मका, सोयाबीन यांसारख्या पारंपारिक पिकांची ते शेती करत असत. मात्र पारंपारिक पिकाच्या शेतीतून त्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नव्हते.
चांगले उत्पादन मिळत नसल्याने परिस्थिती बिकट बनत चालली होती. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर तयार झाला होता. कर्जबाजारी झाल्यामुळे त्यांचे कुटुंब नैराश्यात गेले होते. अशातच त्यांच्या आयुष्यात एक महत्त्वाची घटना घडली. सरलाताईंनी त्यांच्या पतीसोबत चार वर्षांपूर्वी टीव्हीवर ड्रॅगन फ्रुट बाबत माहिती ऐकली. ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीबाबत त्यांनी ए टू झेड माहिती समजून घेतली. यानंतर त्यांनी ड्रॅगन फ्रुट लागवड करण्याचा निर्णय घेतला.
खऱ्या अर्थाने येथेच सरलाताई त्यांच्या आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉईंट आला. ड्रॅगन फ्रुट लागवड करण्याचा निर्णय झाला मात्र पैशांची अडचण होती. परंतु इच्छा असेल तर मार्ग दिसतो या उक्तीप्रमाणे चव्हाण ताई यांनी कर्ज काढून दोन एकरावर ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. सध्या त्यांच्याकडे चार एकरावर ड्रॅगन फ्रुटची बाग आहे.
ते ड्रॅगन फ्रुटची रोपे देखील तयार करतात. रोपांच्या विक्रीतूनही त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना ते परवडणाऱ्या दरात रोपांची विक्री करतात यामुळे इतर शेतकऱ्यांचाही फायदा होतो.
त्यांच्याकडे ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी अनेक लोक येतात. त्यांना ते विनाशुल्क, मोफत मार्गदर्शन करतात. निश्चितच, सरलाताईंनी महिला आता कोणत्या क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत हे दाखवून दिले आहे.