Women Farmer Success Story : अलीकडे शेतीमध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत. शेतीमध्ये होत असलेल्या बदलांमुळे आता शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. शेतकऱ्यांनी आता पीक पद्धतीत बदल करत लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून दाखवले आहे.
असेच एक उत्तम उदाहरण समोर आले आहे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातून. शिराळा तालुक्यातील एका महिला शेतकऱ्याने आपल्या दोन तरुण मुलांच्या साह्याने शेतीमधून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे.
या महिला शेतकऱ्याने उसाच्या पिकात चक्क वांग्याचे आंतरपीक घेऊन अर्धा एकर पेक्षा कमी जमिनीतून सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
यामुळे सध्या या महिला शेतकऱ्याची पंचक्रोशीत चर्चा पाहायला मिळत आहे. महिला शेतकरी राजश्री वसंतराव पाटील आणि त्यांची मुलं सुनील व बाबू यांनी ही किमया साधली आहे.
कसं केलं नियोजन
मिळालेल्या माहितीनुसार, महिला शेतकरी राजश्री पाटील यांनी आपल्या मुलांच्या मदतीने 15 सप्टेंबर 2023 ला उसाची लागवड केली होती.
दरम्यान ऊस लागवड केल्यानंतर अवघ्या दहा दिवसांच्या काळात त्यांनी उसाच्या पिकात वांगी लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सुरुवातीला गावाच्या उकिरड्यावरील खत टाकले.
गावखत टाकल्यामुळे उसाच्या पिकाला आणि वांग्याच्या पिकाला चांगले पोषक घटक मिळाले आणि त्यांची चांगली वाढ झाली. त्रिशूला जातीचे वांगे त्यांनी लावले आहेत.
त्यांनी 18 गुंठ्यात वांग्याची लागवड केली असून आता या वांग्याच्या पिकातून त्यांना उत्पादन देखील मिळू लागले आहे. दररोज 60 ते 70 किलो एवढे वांगे मिळत असून गेल्या दोन महिन्यात त्यांना अडीच टन मालाचे उत्पादन मिळाले आहे.
यातून आजअखेर सव्वा लाख रुपयांची कमाई झाली आहे. विशेष म्हणजे आणखी दोन महिने त्यांना वांग्याच्या पिकातून उत्पादन मिळत राहणार आहे.
उसाच्या पिकात आंतरपीक म्हणून लागवड केलेल्या वांग्याच्या पिकातून लाखों रुपयांची कमाई झाली असल्याने महिला शेतकऱ्याचा हा प्रयोग सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरत आहे.