Wheat Rate : सध्या रब्बी हंगामातील गव्हाचे पीक अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या एक ते दीड महिन्यात गव्हाची हार्वेस्टिंग सुरू होण्याची आशा आहे. मात्र असे असले तरी बाजारात सध्या गव्हाला विक्रमी भाव मिळत आहे.
यामुळे गहू उत्पादकांना मोठा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. गहू हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
राज्यातील प्रमुख बागायती भागांमध्ये रब्बी हंगामात गव्हाची पेरणी केली जाते. यावर्षी मात्र कमी पावसामुळे गहू पेरणी खालील क्षेत्र थोडे कमी झाले आहे.
जिथे मान्सून काळात चांगला पाऊस झाला आणि जिथे शाश्वत पाण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणी फक्त गव्हाची पेरणी झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे या रब्बी हंगामात गव्हाचे उत्पादन कमी होणार अशी भीती व्यक्त होत आहे.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या माध्यमातून सध्या गव्हाला विक्रमी भाव मिळत असला तरी देखील भविष्यात गव्हाचे भाव टिकून राहणार का आणखी किती दिवस गव्हाचे भाव तेजीत राहणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
येथे मिळतोय विक्रमी भाव
सध्या महाराष्ट्रातील जवळपास सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाला हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळत आहे.
2023-2024 या सीझनसाठी केंद्र शासनाने गव्हाला 2125 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे. दुसरीकडे 2024-25 या सीजन साठी केंद्र शासनाने 2275 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे.
सध्या मात्र हमीभावापेक्षा अधिकचा भाव गव्हाला मिळत आहे. आज 17 फेब्रुवारी 2024 रोजी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाचा भाव 4500 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला.
दुसरीकडे, नागपूरच्या बाजारात भुसा गव्हाचा भाव प्रतिक्विंटल ३१०० रुपयांपर्यंत राहिला. तसेच वसई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2860 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
कधीपर्यंत बाजारात तेजी राहणार
जोपर्यंत नवीन गहू बाजारात येत नाही तोपर्यंत गव्हाच्या दरात अशीच तेजी कायम राहणार असा अंदाज तज्ञ लोकांनी व्यक्त केला आहे. नवीन गहू बाजारात येण्यासाठी आणखी एक ते दीड महिन्यांचा काळ बाकी आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत गव्हाच्या बाजारभावात अशीच तेजी राहण्याचा अंदाज जाणकार लोकांनी व्यक्त केला आहे.