Wheat New Variety : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी कामाची ठरणार आहे. गहू हे भाताप्रमाणेच भारतात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या अन्नधान्य पिकाची महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात शेती केली जाते.
राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात गव्हाची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. मात्र, हवामानात होत असणाऱ्या अमुलाग्र अशा बदलांमुळे गहू उत्पादनावर विपरीत परिणाम पाहायला मिळतोय. वाढत्या तापमानामुळे गव्हाचे उत्पादन दिवसेंदिवस घटत चालले आहे.
यामुळे भारतीय शास्त्रज्ञांच्या माध्यमातून गव्हाची एक नवीन जात विकसित करण्यात आली आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेने (ICAR) गव्हाचे नवीन वाण विकसित केले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होतील अन चांगले विक्रमी उत्पादन मिळेल.
भारतीय कृषी संशोधन संस्थेने पुसा गौरव नावाने नवीन जात विकसित केली आहे. या अलीकडेचं विकसित केलेल्या गव्हाच्या या सुधारित जातीला परदेशात प्रचंड मागणी असल्याची माहिती कृषी तज्ञांनी दिली आहे.
जागतिक बाजारात या नव्याने विकसित झालेल्या गव्हाला चांगला भाव मिळतोय. पुसा गौरव (HI 8840) ही गव्हाची सुधारित जात भारतीय आणि परदेशी पदार्थांच्या मानकांची पूर्तता करत आहे. ‘दुरम’ गव्हाची ही नवीन जात अशा प्रकारे विकसित करण्यात आली आहे की त्यापासून उत्कृष्ट चपाती आणि पास्ता दोन्ही बनवता येतात.
यामुळे त्याला बाजारात अधिकचा भाव मिळतो. गव्हाचा हा नवीन वाण ICAR इंदूर प्रादेशिक केंद्राचे प्रमुख आणि प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. जंग बहादूर सिंग यांनी विकसित केला आहे. शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे ‘दुरम’ गव्हाच्या इतर जातीच्या पिठापासून चपाती बनवताना अडचण येते, परंतु ‘पुसा गौरव’ मध्ये ही समस्या नाहीये.
याच्या पिठाची पाणी शोषण्याची क्षमता डुरम गव्हाच्या सामान्य जातींपेक्षा जास्त असते. त्यामुळे त्याच्या रोट्या मऊ होतात. त्यामध्ये पिवळे रंगद्रव्य जास्त असल्याने आणि त्याच्या कडक धान्यामुळे त्यापासून उत्कृष्ट दर्जाचा पास्ता बनवता येतो.
‘पुसा गौरव’ मध्ये प्रथिने (१२ टक्के), लोह (३८.५ पीपीएम) आणि जस्त (४१.१ पीपीएम) यांसारखे पोषक घटक असतात. गव्हाची ही जात हवामान बदलाची आव्हाने लक्षात घेऊन विकसित करण्यात आली आहे.
ही जात कमी सिंचन आणि सामान्यपेक्षा जास्त तापमान असतानाही चांगले उत्पादन देण्यास सक्षम आहे. अर्थातच दुष्काळी परिस्थितीत देखील या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळणार आहे. मर्यादित सिंचन सुविधा असलेल्या या जातीची सरासरी उत्पादन क्षमता ३०.२ क्विंटल प्रति हेक्टर आहे.
त्याच बरोबर यातून हेक्टरी जास्तीत जास्त 39.9 क्विंटल उत्पादन मिळू शकते. ‘दुरम’ गव्हाला ‘मालवी’ किंवा ‘काठिया’ गहू असं देखील म्हणतात. गव्हाच्या या नव्याने विकसित झालेल्या जातीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार अशी आशा आहे.