Wheat Farming : गहू हे महाराष्ट्रासहित भारतात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे अन्नधान्य पीक. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या पिकाची लागवड केली जाते. गेल्या वर्षी कमी पाऊस असतानाही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती.
यंदा तर महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी काळात जोरदार पाऊस झाला आहे. राज्यातील सर्वच विभागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वात जास्त पाऊस मध्य महाराष्ट्रात झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
मध्य महाराष्ट्रातील बागायती भागात दरवर्षी गव्हाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. यंदा या भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असल्याने येथे गहू लागवडीखालील क्षेत्र वाढेल असे जाणकारांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत आज आपण गव्हाच्या काही प्रमुख जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
गहू पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर त्याच्या सुधारित जातींची निवड करणे आवश्यक असते. त्यामुळे जर तुमचाही गहू लागवडीचा प्लॅन असेल तर तुम्ही या सुधारित जातींची निवड केल्यास तुम्हाला चांगले दर्जेदार उत्पादन मिळू शकणार आहेत.
गव्हाची लागवड रब्बी हंगामात केली जाते. जिरायती भागात गहू लागवड करायची असल्यास ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात म्हणजेच 15 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान याची पेरणी करण्याचा सल्ला दिला जातो.
तसेच जर बागायती भागात गव्हाची लागवड करायची असेल तर याची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजेच एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या पंधरा दिवसांच्या काळात करावी असा सल्ला दिला जातो.
गव्हाच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
ज्या शेतकऱ्यांना यंदाच्या रब्बी हंगामात बागायती भागात अन उशिरा पेरणी करायची असेल त्यांनी एन आय ए डब्ल्यू- 34 आणि ए के ए डब्ल्यू-4627 या वाणाची निवड करायला काही हरकत नाही. तसेच जिरायती भागात पेरणीसाठी एन आय डी डब्ल्यू- 15 (पंचवटी) ए के डी डब्ल्यू- 2997-16 (शरद) या जातींची निवड करायला हवी.
ज्या शेतकरी बांधवांना यंदाच्या रब्बी हंगामात बागायती भागात आणि वेळेवर म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात गव्हाची पेरणी करायची असेल त्यांनी एन आय ए डब्ल्यू- 301 (त्र्यंबक), एन आय ए डब्ल्यू- 917 (तपोवन), एम ए सी एस- 6222 हे सरबती वाण निवडायला हवेत. एन आय डी डब्ल्यू-295 (गोदावरी) हा बन्सी वाण देखील बागायती भागात आणि वेळेवर पेरणीसाठी उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे.
निफाड-34 हा गव्हाचा एक प्रमुख वाण आहे. जे शेतकरी बांधव धानाची अर्थातच भाताची लागवड करतात त्यांनी भात काढणी झाल्यानंतर या जातीच्या गव्हाची लागवड केली पाहिजे. या जातीच्या गव्हासाठी दोन ते तीन पाण्याची आवश्यकता असते. गव्हाची ही जात उशिरा पेरणीसाठी विशेष उपयुक्त ठरली आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची शाश्वत उपलब्धता नसेल. पाण्याची उपलब्धता कमी असेल तर एन आय ए डब्ल्यू- 1415 (नेत्रावती) व एच डी 2987 (पुसा बहार) या जातींची निवड करायला हवी. हे प्रमुख सरबती वाण आहेत. या जातीपासून शेतकऱ्यांना कमी पाणी असताना देखील चांगले उत्पादन मिळू शकते.