Wheat Farming : गहू हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची लागवड रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. रब्बी हंगामातील हे महत्त्वाचे अन्नधान्य पीक आपल्या महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये उत्पादित होते. येत्या काही दिवसांनी राज्यात गव्हाची पेरणी सुरू होणार आहे.
ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात गहू पेरणी सुरू होते आणि नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत गव्हाची पेरणी केली जाते. गव्हाची वेळेवर पेरणी ही साधारणता एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या काळात होते.
मात्र यानंतर गहू पेरणीचा सल्ला दिला जात नाही. 15 नोव्हेंबर नंतर गव्हाची पेरणी केल्यास गव्हापासून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामुळे 15 नोव्हेंबर नंतर गहू पेरणी करू नये असे मत काही जाणकार व्यक्त करतात.
दरम्यान, आज आपण गव्हाच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बागायती भागात ज्या जाती 45 ते 50 क्विंटल पर्यंतचे उत्पादन देण्यास सक्षम आहेत त्या जातींची आज आपण माहिती पाहणार आहोत.
गव्हाच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
त्र्यंबक (एन आय ए डब्ल्यू 301 ) : या जातीची बागायती भागात आणि वेळेवर पेरणी केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. या जातीची महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या जातीचे पीक साधारणता 110 ते 115 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होते. या जातीपासून 45 ते 50 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते.
ही जात तांबेरा रोगास देखील प्रतिकारक आहे. खरे तर गव्हाच्या पिकावर येणाऱ्या प्रमुख रोगांमध्ये तांबेरा रोगाचाही समावेश होतो. या रोगामुळे गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात प्रभावित होते आणि उत्पादनात घट येते.
यामुळे तांबेरा रोगास प्रतिकारक असणाऱ्या जातीची लागवड केल्यास चांगली उत्पादन मिळण्याची शक्यता वाढते. गव्हाची ही सुधारित जात अशीच एक प्रमुख जात असून याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. या जातीचे गहू हे चपातीसाठी उत्कृष्ट असून बाजारात या गव्हाला चांगली मागणी सुद्धा आहे.
तपोवन ( एन आय ए डब्ल्यू 917) : ही सुद्धा गव्हाची एक प्रमुख जात आहे. या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले दर्जेदार उत्पादन मिळू शकते. गव्हाच्या या जातीची बागायती भागात लागवड केली जाऊ शकते. महाराष्ट्रातील बागायती भागासाठी गव्हाच्या या जातीची शिफारस करण्यात आली आहे. या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी 45 ते 50 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते असा दावा कृषी तज्ञांनी केला आहे.
ही सुद्धा जात तांबेरा रोगास मध्यम प्रतिकारक असल्याचे आढळले आहे. या जातीचे गहू चपातीसाठी उत्कृष्ट असून बाजारात यांना चांगली मागणी असते. पेरणी केल्यानंतर साधारणतः 115 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होते.
गोदावरी (एन आय डी डब्ल्यू: २९५) : या जातीची बागायती भागात लागवड करता येणे शक्य आहे. मात्र या जातीची वेळेवर पेरणी करण्याचा सल्ला दिला जातो. वेळेवर अर्थातच एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान या जातीची पेरणी केली तर चांगले उत्पादन मिळते. गव्हाच्या या जातीपासून देखील शेतकऱ्यांना 45 ते 50 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते.