Wheat Farming : तुम्हीही यंदा गव्हाची पेरणी केली आहे का ? हो, मग तुमच्यासाठी आजची बातमी खूपच कामाची राहणार आहे. खरे तर गहू हे रब्बी हंगामातील एक मुख्य पीक आहे. या पिकाची वेळेवर पेरणी नोव्हेंबर महिन्यात केली जाते. कृषी तज्ञांनी केलेल्या माहितीनुसार 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर हा काळ वेळेवर गहू पेरणीसाठी सर्वोत्कृष्ट असतो.
तसेच ज्या शेतकऱ्यांना या कालावधीत पेरणी करता येत नाही ते शेतकरी बांधव 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत गव्हाची पेरणी करू शकतात. मात्र उशिरा गव्हाची पेरणी केल्यास उत्पादनात घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर गहू पेरणी करण्याचा सल्ला दिला जात असतो.
खरे तर गेल्या वर्षी महाराष्ट्रात खूपच कमी पावसाची हजेरी लागली. यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातून अपेक्षित असे उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची सारी भिस्त रब्बी हंगामावर येऊन ठेपली. परिणामी महाराष्ट्रासहित अनेक प्रमुख गहू उत्पादक राज्यांमध्ये गहू लागवडी खालील क्षेत्र वाढले आहे.
विशेष बाब अशी की यंदाचे हवामान गहू पिकासाठी अधिक पोषक ठरले आहे. यामुळे गव्हाच्या पिकातून यंदा चांगले दर्जेदार विक्रमी उत्पादन मिळेल अशी आशा केंद्रीय कृषी विभागाने व्यक्त केली आहे. तथापि गव्हाची काढणी करताना शेतकऱ्यांनी काही विशेष गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
गव्हाची काढणी वेळेआधी करू नये. तसेच गव्हाची हार्वेस्टिंग उशिरा होता कामा नये. योग्य वेळेत गव्हाचे हार्वेस्टिंग केल्यास चांगले उत्पादन मिळते अन्यथा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती असते.
कृषी तज्ञ म्हणतात की गव्हाची लवकर काढणी केली तर दाणे पूर्ण परिपक्व होत नाहीत आणि यामुळे पिक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. याऊलट उशिरा हार्वेस्टिंग केली तर धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते.
गव्हाची काढणी केव्हा केली पाहिजे
ज्या शेतकऱ्यांनी उशिरा गव्हाची पेरणी केली असेल त्या शेतकऱ्यांचा गहू अजून काढण्यासाठी अर्थातच हार्वेस्टिंग साठी तयार झालेला नाही. उशिरा पेरणी झालेल्या गव्हांमधून सध्या ओंब्या बाहेर पडत आहेत. दरम्यान उशिरा पेरणी केलेल्या गव्हाला आत्ता पाणी दिले पाहिजे असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे. मात्र वादळी वारे सुरू असेल तर पाणी देणे टाळावे.
दरम्यान यावेळी पाणी देताना तुषार सिंचन पद्धतीने पाणी देऊ नका असे देखील तज्ञांनी म्हटले आहे. जेव्हा गव्हाच्या पिकातुन ओंब्या बाहेर पडतात आणि अशावेळी तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिले गेले तर गव्हाची चकाकी कमी होते. त्यामुळे अशावेळी फ्लड पद्धतीने पाणी देणे आवश्यक आहे.
तसेच गव्हाच्या अशा प्रमुख अवस्थेत 19 19 19 या विद्राव्य खताची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. किंवा मग डीएपी 20 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करण्याचा सल्ला यावेळी तज्ञांनी दिलेला आहे. एकंदरीत जर तुम्ही 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत गव्हाची पेरणी केलेली असेल तर तुमचा गहू अजून परिपक्व झालेला नाहीये.
मात्र ज्या शेतकऱ्यांनी गव्हाची वेळेवर पेरणी केली होती अर्थातच 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर च्या फेजमध्ये गव्हाची पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांचा गहू आता काढणीसाठी तयार झालेला आहे. त्यामुळे वेळेवर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी गव्हाची लवकरात लवकर हार्वेस्टिंग करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे नाहीतर नंतर नुकसान सहन करावे लागू शकते.