Wheat Farming : येत्या काही दिवसांनी रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हीही रब्बी हंगामात गव्हाची लागवड करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. खरंतर गहू हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. याची लागवड राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते.
याप्रमुख बागायती पिकांमधून जर चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर तुम्हाला याच्या सुधारित जातींची लागवड करावी लागणार आहे. त्यामुळे आज आपण गव्हाच्या काही प्रमुख जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पुसा 3386 : गव्हाची ही एक प्रमुख जात आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये या जातीची लागवड पाहायला मिळते. पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान (कोटा आणि उदयपूर विभाग वगळता), पश्चिम उत्तर प्रदेश (झाशी विभाग वगळता), जम्मू आणि काश्मीरचा काही भाग (कठुआ जिल्हा), हिमाचल प्रदेशचा काही भाग (उना जिल्हा आणि पोंटा खोरे) आणि उत्तराखंडच्या तराई क्षेत्रासाठी हा वाण योग्य आहे.
ही जात 62.5 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देण्यास सक्षम आहे. ही तांबेरा रोगास प्रतिरोधक आहे. त्यात लोह (41.1ppm) आणि जस्त (41.8ppm) समृद्ध आहे. 145 दिवसात या जातींचे पीक तयार होते.
करन बोल्ड (DBW 377) : ही जात मध्यवर्ती क्षेत्रासाठी योग्य आहे. ही जात 63.9 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देण्यास सक्षम आहे. याचे पीक 125 दिवसांत तयार होते. ही जात वेगवेगळ्या कीटकांसाठी आणि रोगांसाठी प्रतिकारक आहे. उच्च उत्पादनासाठी ओळखली जाणारी ही जात देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित केली जाते.
एचडी ३४१० : ही जात बागायती व लवकर पेरणीसाठी योग्य आहे. ही जात 65.91 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देण्यास सक्षम आहे. १५५ दिवसांत या जातीचे पीक परिपक्व होते. त्यात १२.६% जास्त प्रथिने असतात. देशातील अनेक प्रमुख गहू उत्पादक राज्यांमध्ये याची लागवड पाहायला मिळते.
HI 1665 : ही वेळेवर पेरणी करण्यासाठी आणि मर्यादित सिंचन क्षेत्रात लागवडीसाठी उपयुक्त जात आहे. त्याची उत्पादन क्षमता 33 क्विंटल प्रति हेक्टर आहे. 110 दिवसांत या जातींचे पीक परिपक्व होते. ही उष्णता आणि दुष्काळ सहनशील जात आहे. पान आणि देठ तांबेरा रोगास प्रतिकारक असतात. याचे धान्य उत्तम दर्जाचे असते. ही जात महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या सपाट प्रदेशासाठी उपयुक्त आहे.
एचडी ३३८८ : ही जात वेळेवर पेरणी करण्यासाठी उपयुक्त आहे. त्याचे उत्पादन हेक्टरी 52 क्विंटल आहे. 125 दिवसांत पीक तयार होते. त्याची उष्णता ताण सहनशीलता HSI 0.89 आहे. उच्च उत्पादनासाठी ओळखली जाणारी ही जात देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होते.