Wheat Farming : गहू हे राज्यासहित संपूर्ण देशभरात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. धान म्हणजे भातासारखेचं गव्हाचेही आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, गुजरातसहित देशातील अनेक राज्यांमध्ये गव्हाचे उत्पादन घेतले जाते.
आपल्या महाराष्ट्रातही पश्चिम महाराष्ट्र सहित सर्वत्र गव्हाची लागवड नजरेस पडते. यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
देशातील शास्त्रज्ञांच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न होत आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून देशातील शास्त्रज्ञांनी अलीकडेच गव्हाची एक नवीन जात विकसित केली आहे. विशेष म्हणजे ही जात नुकतीच प्रसारित करण्यात आली आहे.
11 ऑगस्ट रोजी, IARI-नवी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध पिकांच्या 109 नव्या वाणांचे देशाला अनावरण करण्यात आले. या 109 जातींमध्ये गव्हाच्या या अलीकडेच विकसित झालेल्या जातीचा देखील समावेश होता.
गव्हाची ही जात डॉ. जे.बी. सिंग, मुख्य आणि प्रमुख शास्त्रज्ञ, ICAR – भारतीय कृषी संशोधन संस्था, प्रादेशिक केंद्र, इंदूर (MP) यांनी विकसित केली आहे. दरम्यान, आता आपण या गव्हाच्या सुधारित जातीची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एचआय 1665 गव्हाच्या विशेषता
गव्हाची एचआय 1665 म्हणजे पुसा शरबती ही गव्हाची नवीन जात वेळेवर पेरणी करण्यासाठी शिफारशीत करण्यात आली आहे. मर्यादित सिंचन परिस्थितीमध्ये या जातीची लागवड करता येणे शक्य आहे.
हे विशेषतः द्वीपकल्पीय आणि मध्य भारतासाठी शिफारसीत आहे. उत्पादन क्षमतेबद्दल बोलायचे झाल्यास, ही जात ३३.० क्विंटल/हेक्टरपर्यंत (मर्यादित सिंचन परिस्थितीत) उत्पन्न देऊ शकते. पण संभाव्य धान्य उत्पादन ४३.५ क्विंटल/हेक्टर इतके आहे.
गव्हाची ही जात 110-115 दिवसांत तयार होईल. तसेच, या जातीच्या गव्हाची उंची 85-90 सेमी असल्याचे आढळून आले आहे आणि 1000 दाण्यांचे वजन 44 ग्रॅम असल्याचे आढळून आले आहे. काळा आणि भुरा तांबेरा रोगास या जातीचे पीक प्रतिकारक आहे.