Wheat Farming : सध्या महाराष्ट्रासहित देशातील विविध भागात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. आपल्या राज्यातही कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे. आगामी काही दिवस राज्यात असंच पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणी मात्र गुलाबी थंडीची चाहूल लागली असल्याने रब्बी हंगामातील पीक पेरणीला वेग आला आहे. विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पेरणी पूर्ण देखील झाली आहे. काही शेतकरी बांधव मात्र रब्बी हंगामातील पीक पेरणीला आता सुरुवात करणार आहेत. यंदाच्या रब्बी हंगामात कमी पावसामुळे पिक पेरा घटणार असा प्राथमिक अंदाज आहे.
परंतु ज्या भागात पावसाळी काळात समाधानकारक असा पाऊस झाला आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याची सोय आहे असे शेतकरी बांधव रब्बी हंगामात गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी करणार अशी शक्यता आहे. खरंतर गव्हाची एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत वेळेवर पेरणी केली जाते. यानंतर 15 नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान गव्हाची उशिराने पेरणी होत असते.
मात्र वेळेवर गव्हाची पेरणी केली तर चांगले उत्पादन मिळते. गव्हाच्या पेरणीला उशीर झाला तर उत्पादनात घट येत असते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना गव्हाची पेरणी करायची असेल त्यांनी वेळेवर गव्हाची पेरणी केली पाहिजे असे मत करू शकत नाही व्यक्त केले आहे. दरम्यान आज आपण राज्यातील शेतकऱ्यांसाठी गव्हाच्या एका सुधारित जातीची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
या गव्हाच्या वाणाची लागवड शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर
खरंतर राज्यातील शेतकरी बांधव गव्हाच्या अजित 109, श्रीराम सुपर 303, सिजेंटा कंपनीचे Neenv 1544, श्रीराम सुपर 111, लोकवण, अंकुर केदार, महको मुकुट यांसारख्या इत्यादी वाणाची पेरणी करत असतात. या गव्हाच्या वाणातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन देखील मिळते.
मात्र गव्हाच्या या सामान्य जाती सोबतच अलीकडे काळ्या गव्हाची लागवड देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या Black Wheat गव्हाची लागवड मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. आपल्या राज्यातील प्रयोगशील शेतकरी बांधव देखील काळ्या गव्हाची अलीकडे लागवड करू लागले आहेत.
या वाणाच्या गव्हात विविध औषधी गुणधर्म आढळत असल्याने याला बाजारात मोठी मागणी असते. मीडिया रिपोर्टनुसार, या जातीचा गहू बाजारात तब्बल आठ हजार रुपये प्रति क्विंटल या दरात विकला जात आहे. यामुळे गव्हाच्या या वाणाची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
काळ्या गव्हाच्या विशेषता
या जातीच्या गव्हात सामान्य गव्हापेक्षा 60 टक्के अधिक लोह आढळते. या गव्हात अँथोसायनिन हा घटक मोठ्या प्रमाणात आढळतो यामुळेच या गव्हाचा रंग काळा बनतो. या गव्हात अँटिऑक्सिडंट देखील मोठ्या प्रमाणात असतात यामुळे या गव्हाचे सेवन मानवी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हेच कारण आहे की या गव्हाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
केव्हा पेरणी करावी
जर तुम्ही काळा गहू पेरणी करू इच्छित असाल तर या गव्हाची पेरणी 30 नोव्हेंबर पर्यंत करावी असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिला आहे. या गव्हाच्या पेरणीसाठी एकरी 40 ते 50 किलो बियाणे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
यातून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी पिकाला चार ते पाचदा पाणी भरण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे. पेरणीनंतर साधारणता 3 आठवड्यांनी पहिले पाणी दिले गेले पाहिजे. यानंतर मग ओंब्या फुटण्याच्या वेळी आणि दाणे पिकण्याच्या वेळी पाणी दिले पाहिजे.