Wheat Farming : गव्हाचा विषय निघाला की हरियाणा, पंजाब, यूपी, एमपी या राज्यांची नावे आपसूक आपल्या तोंडात येतात. पण आपले महाराष्ट्र देखील गव्हाच्या उत्पादनात मागे राहिलेले नाही. राज्यातील गहू लागवडीखालील क्षेत्र नक्कीच इतर काही राज्यांच्या तुलनेत कमी आहे पण राज्यात उत्पादित होणाऱ्या गव्हाला बाजारात चांगला उठाव आहे. राज्यातील प्रमुख बागायती भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पादन होते.
पण रब्बी हंगामातील या मुख्य पिकातून जर चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर कीड आणि रोग नियंत्रणावर विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे. गव्हाच्या पिकात मावा किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पाहायला मिळतो. यासोबतच तांबेरा आणि करपा रोग देखील गव्हाच्या पिकावर मोठ्या प्रमाणात दिसतो आणि यामुळे पीक उत्पादनात मोठी घट येते.
म्हणून आज आपण मावा किडीवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचे आणि सोबतच तांबेरा असेच करपा रोगावर कशा तऱ्हेने नियंत्रण मिळवले जाऊ शकते यासंदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. या किडीच्या आणि रोगांच्या नियंत्रणासाठी कृषी तज्ञांनी ज्या फवारण्या सजेस्ट केलेल्या आहेत त्या फवारण्यांची माहिती आज आपण घेणार आहोत.
मावा किडीवर कसं नियंत्रण मिळवणार?
गहू पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. पण गेल्या महिन्याच्या शेवटी राज्याचे हवामान तयार झालं त्यामुळे गव्हाच्या पिकावर विपरीत परिणाम दिसून आला. अनेक ठिकाणी गव्हाच्या पिकाची वाढ खुंटली. पिकांना सध्या आवश्यक असलेली थंडी थोडीशी गायब झाली आहे. अन अधूनमधून ढगाळ हवामान सुद्धा होतंय, यामुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होण्याचीही शक्यता आहे.
राज्यातील काही भागांमधील गव्हावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसला. जर तुमच्याही गहू पिकात असाच प्रादुर्भाव असेल तर तुम्ही मावा किडीच्या नियंत्रणासाठी थायोमेथोक्झाम २५ डब्ल्यूजी, १ ग्रॅ. किंवा ॲसिटामीप्रिड २० एसपी, ५ ग्रॅ. १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करायला हवी. आता जर तुम्ही पहिली फवारणी घेतली तर पुढील १५ दिवसांनी सेम फवारणी घ्यायची आहे.
तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी काय कराल?
गव्हावरील तांबेरा रोगाची लागण दिसून येताच मॅंकोझेब/झायनेब ७५ डब्ल्यूपी बुरशीनाशकाची ३० ग्रॅ. दहा लिटर पाण्यातून किंवा प्रोपीकोनाझोल २५ % इसी १० मि.ली. १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. जर गरज भासली तर ज्या दिवशी तुम्ही फवारणी कराल त्या दिवसापासून पुढील पंधरा दिवसात पुन्हा एकदा सेम फवारणी घ्यावी. या औषधांच्या फवारणीमुळे तांबेरा रोग बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतो आणि यामुळे उत्पादनात घट येत नाही.
करपा रोगाच्या नियंत्रणासाठी काय कराल?
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार गव्हाच्या पिकावर करपा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असेल तर करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड + मॅन्कोझेब प्रत्येकी २० ग्रॅ. १० लिटर पाण्यातून फवारावे. तसेच याच सेम औषधांची दुसरी फवारणी देखील घ्यावी. दुसरी फवारणी १५ दिवसांनी करावी, असा सल्ला कृषी तज्ञांनी दिलाय.