Goat Rearing : आपल्या देशात पशुपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतकरी बांधव शेळीपालन देखील मोठ्या प्रमाणात करत आहेत. पशुपालन व्यवसाय विशेषतः शेळीपालनाचा व्यवसाय उत्पन्नाच्या दृष्टीने फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले आहे.
खरेतर पशुपालनात फक्त शेळीपालनाचाच पर्याय शेतकऱ्यांपुढे आहे असे नाही तर गाय पालन, म्हैस पालन, ससा पालन, वराह पालन, कुकूटपालन असे अनेक पर्याय आहेत. पण या बातमीत आम्ही शेळीपालनाविषयी सांगणार आहोत.
शेळीपालन हे विशेष आहे कारण शेळीपालन करून तुम्ही कमी वेळात दोन प्रकारे पैसे कमवू शकता. दूध आणि मांस विकून यातून मोठ्या प्रमाणात कमाई करता येते.
मात्र, अनेक वेळा शेळीपालकांना शेळीच्या चांगल्या जातीची माहिती नसल्याने नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे आज आपण शेळीच्या चार प्रमुख जातींची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ब्लॅक बंगाल : शेळ्यांच्या विशेष जातींमध्ये, ब्लॅक बंगाल शेळ्यांचे नाव पहिल्यांदा घेतले जाते. या जातीच्या शेळ्या मांस उत्पादनासाठी फायदेशीर आहेत. या शेळीचे मांस हे खूपच चविष्ट आणि पौष्टिक असून याच्या मांसाला बाजारात चांगली मागणी असते.
या शेळ्यांचे आयुष्य 8-10 वर्षे असते. ब्लॅक बंगाल शेळीचा गर्भधारणा कालावधी 150 दिवसांचा असतो. ती एकावेळी 2-3 बाळांना जन्म देऊ शकते. या शेळीच्या मांसाची किंमत 1000 रुपये किलोपर्यंत आहे.
बीटल : ब्लॅक बंगाल या शेळी प्रमाणेच बीटल ही देखील शेळीची एक प्रमुख जात आहे. या शेळ्या काळ्या, गडद लाल रंगाच्या असतात आणि या शेळीच्या शरीरावर ठिपके असू शकतात. या शेळीची शिंगे वरच्या दिशेला असतात.
या शेळ्या दररोज दीड लिटर दूध देऊ शकतात. मात्र, त्यांच्या मांसालाही मोठी मागणी आहे. त्यांच्या चामड्यापासून अनेक उपयुक्त वस्तूही बनवल्या जातात. ही शेळी पंजाब मध्ये मोठ्या प्रमाणात दिसते. दूध आणि मांस अशा दुहेरी उद्देशाने या शेळीचे पालन केले जाते.
उस्मानाबादी : ही शेळीची एक देशी जात असून महाराष्ट्रात या जातीच्या शेळीचे मोठ्या प्रमाणात पालन होते. गावठी उस्मानाबादी शेळ्या दूध उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात. या जातीच्या शेळी पासून मिळणारे दूध मानवी शरीरासाठी अतिशय पौष्टिक असते. या शेळ्या दररोज दीड लिटर दूध देऊ शकतात.
वर्षातून दोनदा दोन बाळांना जन्म देतात. त्यांचा आकारही मोठा असतो. या शेळ्यांकडून 45-50 किलोपर्यंत मांस मिळू शकते. या जातीच्या शेळ्या सामान्यतः उस्मानाबाद जिल्ह्यातील लातूर, उदगीर, तुळजापूर या भागात आढळतात. राज्यातील हवामान या जातीच्या शेळीसाठी विशेष अनुकूल असून राज्यातील शेतकरी बांधव याच्या संगोपनातून चांगली कमाई करताना दिसत आहेत.