Weather Update : गेल्या सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाची हजेरी लागली. गेल्या महिन्यात राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात राज्यात अपेक्षित असा पाऊस झाला नसल्याने सप्टेंबर मध्ये शेतकऱ्यांना जोरदार पावसाची गरज होती.
दरम्यान हवामान खात्याने सप्टेंबर मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे शेतकरी मोठे चिंतातूर होते. परंतु सप्टेंबर मध्ये राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आणि यामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर बसलेल्या महाराष्ट्राला दिलासा मिळाला. दरम्यान आता ऑक्टोबर महिन्यात कस हवामान राहणाऱ याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
अशातच हवामान विभागाने आज अर्थातच एक ऑक्टोबर रोजी राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच हवामान खात्याने महाराष्ट्रातून मान्सून केव्हा माघारी फिरणार याबाबत देखील महत्त्वाची माहिती दिली आहे.
हवामान खात्याने आज राज्यातील काही जिल्ह्यांना यलो आणि काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. आज कोकणातील दक्षिण भागात आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण मध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे तर कोकणातील सिंधुदुर्ग मध्ये आज अतिमुसळधार पाऊस पडणार असा अंदाज असून सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि विदर्भातील नागपूर सह बहुतांशी जिल्ह्यात आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. आय एम डीने वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार येत्या 2 दिवसात कोकण आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस होऊ शकतो. दक्षिण कोकणात मात्र या कालावधीमध्ये पावसाचा जोर अधिक राहणार आहे.
तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर दुसरीकडे राजधानी मुंबई आणि उपनगरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच महाराष्ट्रातून 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरेल असे सांगितले जात आहे. पुणे वेधशाळेच्या शिल्पा आपटे यांनी 4 ऑक्टोबर पासून राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचा दावा केला आहे.