Weather Update : गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. देशातील काही भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी थंडीची लाट आली आहे. याचा परिणाम म्हणून आपल्या महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी किमान तापमान कमी झाले आहे तर काही ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली आहे.
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या देशाच्या उत्तरेकडील भागांमध्ये कडाक्याची थंडी सुरू आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश सारख्या बर्फवृष्टी होत आहे. यामुळे राज्याच्या विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र विभागात थंडीची लाट आली आहे.
दुसरीकडे देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. यामुळे राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण, दक्षिण महाराष्ट्र या भागात किमान तापमान थोडेसे वाढलेले पाहायला मिळत आहे.
यामुळे संबंधित भागात थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे. अशातच स्कायमेंट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने देशाच्या हवामान अंदाजाबाबत एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.
Skymet ने वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, देशातील काही राज्यांमधील हवामान रविवारी खूपच खराब होणार असा अंदाज आहे. गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पुढील 2 दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
एवढेच नाही तर या राज्यामधील काही भागात हिमवृष्टीचीही शक्यता आहे. जम्मू-काश्मीर आणि हिमाचलमध्ये बर्फ पडणार आहेत.
यामुळे येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी ही निश्चितचं आनंदाची बातमी राहणार आहे. मात्र, यामुळे देशातील काही राज्यांमधील किमान तापमानात आणखी घसरण होऊ शकते. प्रामुख्याने उत्तरेकडील राज्यांमध्ये यामुळे गारठा वाढणार आहे.
या 5 राज्यांमध्ये गारपिट होईल
हवामान खात्याने 24 डिसेंबर 2023 रोजी अर्थातच आज देशाच्या काही भागात गारपीट होणार अशी भीती व्यक्त केली आहे. आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये आज काही ठिकाणी गारपीट होऊ शकते असा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना विशेष सावध राहण्याची गरज आहे.
या राज्यांमधील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. उत्तराखंडमध्ये मात्र आज हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, येथील काही भागात पावसामुळे तापमानात घट होणार आहे. याशिवाय डोंगराळ भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
त्याचवेळी अंदमान आणि निकोबार बेट, तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात मात्र आता हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. म्हणजे आता राज्यात अवकाळी पाऊस बरसणार नाही.