Weather Update : नैऋत्य मान्सूनवर एलनिनोचा प्रभाव वाढला आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रासहित देशातील काही राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. अनेक राज्यात पावसाची तूट पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राची परिस्थिती या चालू ऑगस्ट महिन्यात चांगलीच बिकट झाली आहे.
वास्तविक गेल्या जुलै महिन्यात राज्यातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला होता. पावसाने अक्षरशा झोडपले होते. काही भागात अतिवृष्टी झाली होती. याचा परिणाम म्हणून राज्यातील अनेक भागात जलमग्न परिस्थिती पाहायला मिळाली. अनेक भागात पुर आला होता.
मात्र आता गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पाऊस सुट्टीवर गेला आहे. चालू महिन्यातील पावसाचा खंड मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढवत आहे. राज्यात या चालू महिन्यातील चार ऑगस्टपर्यंत काही भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या सऱ्या बरसल्यात. मात्र मुसळधार पाऊस कुठेच पडला नाही.
अशातच आता हवामानात मोठा बदल होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने पावसासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी दिली आहे. राज्यात 13 ऑगस्ट पासून हवामानात मोठा बदल होणार असून पावसासाठी पोषक हवामान तयार होईल असे आय एम डी ने सांगितले आहे.
13 ऑगस्ट पासून राज्यातील कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे. कोकणातील बहुतांशी ठिकाणी पाऊस पडणार आहे तर विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एवढेच नाही तर 15 ऑगस्ट पासून सर्वदूर पावसाचा अंदाज आहे.
तसेच मान्सूनच्या नवीन प्रणालीनुसार आता कमी वेळेत अधिक पाऊस पडणार असल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत येत्या दोन दिवसानंतर राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे आता हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरतो का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
तसेच जर हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला तर राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळणार असून खरीप हंगामातील पिकांना यामुळे जीवनदान मिळणार असं सांगितलं जात आहे.