Vihir Anudan Yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. काल अर्थातच 5 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी सुरू असणाऱ्या एका महत्त्वाच्या योजनेत बदल करण्यावर शिकामोर्तब झाले आहे. या नवीन नियमानुसार आता शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसाठी आधीच्या तुलनेत अधिक अनुदान दिले जाणार आहे.
खरे तर भारत हा एक शेतीप्रधान देश असून देशाच्या कृषी क्षेत्राला बळकटी मिळावी यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून नानाविध योजना राबवल्या जात आहेत.
महाराष्ट्र राज्य सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुद्धा राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी शेतकऱ्यांना अनुदान पुरवले जाते. दरम्यान याच योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.
कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे सरकारने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी, शेततळे, वीज जोडणी साठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला असून यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.
किती अनुदान मिळणार ?
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपये आणि जुन्या विहिरीसाठी 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जात होते. मात्र आता या योजनेत सरकारने बदल केला असून नवीन आणि जुन्या विहिरीसाठीच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे.
यानुसार आता नवीन विहीर खोदण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत तब्बल चार लाख रुपये आणि जुन्या विहिरीसाठी तब्बल एक लाख रुपये एवढे अनुदान दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत फक्त विहिरीसाठी अनुदान मिळते असे नाही तर शेततळे, वीज जोडणीसाठी सुद्धा भरीव अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत इतर बाबींसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात सुद्धा वाढ झाली आहे. शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता इनवेल बोअरिंगसाठी 40 हजार तसेच यंत्रसामुग्रीसाठी 50 हजार रुपये आणि परसबागेकरिता 5 हजार देण्यात येणार आहेत.
शेततळ्याच्या प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी 1 लाख अनुदान मिळतं होते. मात्र यापुढे ते प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्के किंवा 2 लाख यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान वितरित केले जाणार आहे. तुषार सिंचनासाठी 25 हजार मिळतं होते पण यापुढे तुषार सिंचन संच साठी 47 हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्के एवढे अनुदान मिळेल.
अशाचप्रमाणे ठिबक सिंचन संचासाठी अल्प, अत्यल्प आणि बहुभूधारकांना 97 हजार किंवा ठिबक सिंचन संचाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्क्यांपैकी जे कमी असेल तेवढे अनुदान दिले जाणार आहे. एवढेच काय तर नवीन विहिरींबाबत 12 मिटर खोलींची अट आणि दोन सिंचन विहिरींमधील 500 फूट अंतराची अट सुद्धा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
कोणाला लाभ मिळणार?
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र या योजनेचा लाभ राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना मिळत नाही. याचा लाभ फक्त आदिवासी समाजातील शेतकऱ्यांना मिळतो. अर्थातच एस टी कॅटेगिरी मध्ये म्हणजेच अनुसूचित जमाती कॅटेगरीमध्ये ज्या शेतकऱ्यांचा समावेश होतो त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
नक्कीच शासनाच्या निर्णयामुळे राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून यामुळे लागवडीखालील क्षेत्र वाढणार आहे. शासनाचा हा निर्णय बागायती क्षेत्रात वाढ घडवून आणेल असा विश्वास तज्ञांनी सुद्धा व्यक्त केला आहे.