Vihir Anudan Yojana : भारत हा एक कृषी प्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहे. यामुळे देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्य सरकार देखील आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. खरंतर शेतकऱ्यांना शेतीमधून शाश्वत उत्पादन मिळवायचे असेल तर सिंचनाची व्यवस्था असणे आवश्यक असते.
शेतकरी बांधव सिंचनाच्या पूर्ततेसाठी विहिरी आणि शेततळे खोदतात. मात्र विहीर खोदण्याचे काम काही सोपे नसते. विहिरीसाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. सिंचन विहिरीसाठी शेतकऱ्यांना लाखो रुपये मोजावे लागतात.
मात्र अनेक शेतकऱ्यांना पैशांच्या अडचणीमुळे विहिरीचे काम पूर्ण करता येत नाही. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन शासन सिंचन विहिरीसाठी अनुदान उपलब्ध करून देते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी सुद्धा अनुदान मिळते.
अशा परिस्थितीत आता आपण महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा आढावा घेणार आहोत.
विहिरीसाठी किती अनुदान मिळतं ?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत नवीन विहिरीसाठी कमाल अडीच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. तसेच जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी या योजनेअंतर्गत कमाल 50 हजार रुपयांचे अनुदान मिळते.
कोणाला लाभ मिळू शकतो
राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना मिळत नाही. या योजनेचा लाभ राज्यातील फक्त आणि फक्त अनुसूचित जाती आणि नव बौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांनाच मिळू शकतो.
अर्ज कुठे करावा लागणार?
https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसाठी अर्ज सादर करता येणार आहे. जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या कृषी विभागाशी संपर्क साधून या योजनेबाबत अधिक ची माहिती मिळवता येणे शक्य आहे.