Vatana Lagwad : यावर्षी महाराष्ट्रासहीत संपूर्ण देशभरात मानसून चांगला दमदार झाला आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात दुष्काळ होता. यंदा मात्र तशी परिस्थिती नाहीये. यामुळे यावर्षी खरीप हंगामा सोबतच रब्बी हंगामातूनही शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळणार अशी आशा आहे. दरम्यान, जर तुम्हीही रब्बी हंगामात वाटाणा लागवड करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास ठरणार आहे.
खरंतर, वाटाण्याची लागवड रब्बी हंगामात केली जाते. याची लागवड ऑक्टोबर महिन्यात होते. मात्र अनेक शेतकरी बांधव याची आगात लागवड करतात. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत वाटाण्याची आगात लागवड केली जाऊ शकते.
दरम्यान आज आपण आगात लागवडीसाठी शिफारशीत वाटाण्याच्या टॉप तीन जातींची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
आगात लागवडीसाठी वाटाण्याच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
अर्ली बॅजर : ही वाटाण्याची एक विदेशी जात आहे. या प्रकारची वनस्पती खूपच बुटकी असते. ही जात लागवडीनंतर सुमारे 50 ते 60 दिवसांनी ते प्रथम काढणीसाठी तयार होते. या जातीच्या प्रत्येक शेंगामध्ये सरासरी 5 ते 6 दाणे आढळतात.
या जातीच्या वनस्पतींचे सरासरी उत्पादन हेक्टरी सुमारे 10 टन इतके आहे. म्हणजे सप्टेंबरमध्ये या जातीची लागवड करून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात. कृषी तज्ञांनी शेतकऱ्यांना या जातीच्या लागवडीचा सल्ला दिलेला आहे.
अर्केल : ही सुद्धा वाटाण्याची एक विदेशी जात आहे. ही एक युरोपीय जात असून देशभरातील शेतकऱ्यांमध्ये ही जात लोकप्रिय आहे. या जातीची धान्ये गोड असतात. ही वाटाण्याच्या लवकर परिपक्व होणाऱ्या जातींपैकी एक आहे.
त्याच्या शेंगा पेरणीनंतर सुमारे 60 ते 65 दिवसांनी तोडण्यासाठी तयार होतात. याच्या शेंगा तलवारीच्या आकाराच्या, 8 ते 10 सेमी लांब आणि त्यात 5 ते 6 दाणे असतात. जर तुम्हालाही वाटाण्याची आघात लागवड करायची असेल तर ही जात तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे.
काशी नंदिनी : सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यात लागवडीसाठी काशी नंदिनी ही वाटाण्याची सुधारित जात फायदेशीर आहे. आगात लागवडीसाठी उपयुक्त या जातीचे पीक लागवडीनंतर अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीत परिपक्व होते.
या जातीच्या शेंगांमध्ये सात ते नऊ दाणे आढळतात. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे एकाच वेळी शेंगा तयार होतात. या जातीपासून हेक्टरी 110 ते 120 क्विंटल वाटाण्याचे उत्पादन मिळू शकते. यामुळे जर तुमचाही आगात वाटाणा लागवडीचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी ही जात फायदेशीर ठरणार आहे.