Vande Sadharan Train : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असल्याने शिवाय भारतीय रेल्वेचे नेटवर्क देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले असल्याने रेल्वेने प्रवास करण्यास विशेष पसंती दाखवली जात आहे.
विशेष म्हणजे भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांचा प्रवास सोयीचा आणि आरामदायी व्हावा यासाठी वेगवेगळ्या ट्रेन देखील सुरू केल्या जात आहेत.
यामध्ये अलीकडेच सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा देखील समावेश होतो. वंदे भारत एक्सप्रेस ही 2019 मध्ये सुरू झाली.
मात्र अगदी काही वर्षांच्या काळात या गाडीने प्रवाशांच्या मनात घर केले आहे. या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. नवनवीन मार्गांवर ही गाडी सुरू करण्यासाठी मागणी केली जात आहे.
मात्र ही जरी वास्तविकता असली तरी देखील या वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर काहींना महाग वाटते. ही गाडी सर्वसामान्यांना परवडत नाही असा आरोप केला जातो. सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास परवडत नाहीये.
यामुळे सध्या स्थितीला सुरु असलेल्या 41 महत्त्वाच्या मार्गांवरील वंदे भारत एक्सप्रेसपैकी अनेक मार्गांवरील वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळत आहे.
हेच कारण आहे की, भारतीय रेल्वेच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी आता वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर अमृत भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या देशात दोन अमृत भारत ट्रेन चालवल्या जात असून आगामी काळात आणखी 50 नवीन अमृत भारत ट्रेन चालवल्या जाणार अशी घोषणा दस्तूरखुद्द केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.
सध्या नवी दिल्ली ते आयोध्या आणि मालदा ते बेंगलोर या मार्गावर अमृत भारत ट्रेन चालवली जात आहे. खरेतर या ट्रेनला आधी वंदे साधारण ट्रेन म्हणून ओळखले जात होते.
वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणेच फीचर्स असणारी या ट्रेनला आता अमृत भारत ट्रेन म्हणून ओळखले जात आहे. निश्चितच ही हाय स्पीड ट्रेन देशातील काही महत्त्वाच्या मार्गांवर सुरू झाली तर रेल्वे प्रवाशांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे.