Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील पहिली मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आलेली हाय स्पीड ट्रेन म्हणून ओळखली जात आहे. ही गाडी 2019 मध्ये सर्वप्रथम रुळावर धावली होती. पहिल्यांदा नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर ही गाडी सुरू करण्यात आली.
ही गाडी सुरू झाली आणि अल्प कालावधीतच या गाडीला रेल्वे प्रवाशांनी डोक्यावर घेतले. या गाडीचा वेग इतर एक्सप्रेस गाड्यांच्या तुलनेत अधिक असल्याने तसेच या गाडीमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा प्रवाशांना उपलब्ध होत असल्याने ही ट्रेन प्रवाशांमध्ये लोकप्रिय झाली आहे.
या गाडीची लोकप्रियता एवढी वाढली आहे की आता वेगवेगळ्या भागातून या गाडीला सुरू करण्यासाठी मागणी केली जात आहे. सध्या स्थितीला देशातील 34 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू आहे.
मात्र मार्च 2024 पर्यंत देशातील जवळपास 75 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला सुरू करण्याचे नियोजन भारतीय रेल्वेने आखले आहे. यासाठी रेल्वेच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न देखील केले जात आहेत. अशातच आता देशातील आणखी एका महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
कोणत्या मार्गावर सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेश मधील लखनऊ ते बिहार मधील पटना यादरम्यान लवकरच वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. ही गाडी वाया सुलतानपूर चालवली जाणार आहे. उत्तर रेल्वे लखनौ विभाग प्रशासनाने या ट्रेनसाठी मार्गाचे सर्वेक्षणही पूर्ण केले असल्याचे सांगितले जात आहे.
लखनौ-पाटणा वंदे भारत एक्स्प्रेसचा रेकही रेल्वे बोर्डाला रेल्वे कोच फॅक्टरीमधून वाटप करण्यात आला आहे. यामुळे रेल्वे बोर्ड लवकरच ही गाडी सुरू करण्याबाबतची अधिसूचना जारी करू शकते, असे काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये नमूद करण्यात आले आहे.
लखनौ ते डेहराडूनपर्यंत वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचे सर्वेक्षण उत्तर रेल्वेच्या लखनौ आणि मुरादाबाद विभागांनी महिनाभरापूर्वी केले होते. आता तिसऱ्या मार्गासाठी लखनौहून सुलतानपूर-वाराणसी मार्गे पाटणा या मार्गाची निवड करण्यात आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस लखनौहून पाटण्यासाठी सकाळी धावू शकते. तसेच पाटणा ते लखनौ ही ट्रेन देखील सकाळीचं धावणार आहे.
रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्स्प्रेसच वेळापत्रक त्या सेक्शनवरून धावणाऱ्या गाड्यांच्या अहवालाच्या आधारे तयार केले जाणार आहे. तूर्तास मात्र याचे वेळापत्रक तयार झालेले नाही. निश्चितच या मार्गावर जर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाले तर या भागातील रेल्वे प्रवाशांना याचा मोठा फायदा मिळणार आहे.
सध्या महाराष्ट्रातील कोणत्या मार्गांवर वंदे भारत धावताय?
सध्या स्थितीला राज्यातून सहा वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. राज्यातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपुर, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर आणि इंदूर ते नागपूर या मार्गावर ही गाडी सुरू आहे.
विशेष म्हणजे येत्या काही महिन्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर या दरम्यान देखील वंदे भारत ट्रेन चालवली जाणार आहे. याशिवाय पुणे ते वडोदरा, मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते छत्रपती संभाजीनगर, पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर देखील वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत.