Vande Bharat Train : 2019 मध्ये सुरू झालेली वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेली पहिली हाय स्पीड ट्रेन आहे. ही गाडी सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू झाली होती.
या गाडीचे उद्घाटन दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील अन्य महत्वाच्या मार्गावर या गाडीचे संचालन सुरू झाले. आतापर्यंत देशातील 35 महत्त्वाच्या मार्गांवर ही हाय स्पीड ट्रेन सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे मार्च 2024 पर्यंत अजूनही अनेक महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला चालवले जाणार आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितल्याप्रमाणे वर्ष 2047 पर्यंत देशात जवळपास 4,500 वंदे भारत एक्सप्रेस धावतील.
म्हणजेच देशात वंदे भारत एक्सप्रेसचे संपूर्ण जाळे तयार करण्याचा प्लॅन भारतीय रेल्वेने आणि शासनाने आखला आहे. यामुळे निश्चितच देशातील कानाकोपऱ्यात आता वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे.
अशातच आता मीडिया रिपोर्टमध्ये लवकरच देशातील 12 महत्त्वाच्या मार्गावर ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी माहिती देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्राला देखील लवकरच आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. सध्या आपल्या महाराष्ट्रात सहा वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपुर, इंदोर ते नागपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या मार्गांवर ही गाडी धावत आहे.
आता आपण भारतीय रेल्वे कोणत्या 12 महत्त्वाच्या मार्गांवर नवीन वंदे भारत ट्रेन चालवणार याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या मार्गावर सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
- पुणे-सिकंदराबाद
- जम्मू-श्रीनगर
- बेंगलोर-कोयंबटूर
- मुंबई-जालना
- पुणे-वडोदरा
- टाटानगर-वाराणसी
- पटना-जलपाईगुडी
- मडगाव-मंगलोर
- दिल्ली-अमृतसर
- इंदूर-सुरत
- मुंबई-कोल्हापूर
- पाटणा-न्यू जलपायगुडी