Vande Bharat Train : येत्या नवीन वर्षात अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य राम मंदिर बांधून तयार होणार आहे. या मंदिरात जानेवारी महिन्यात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यानंतर हे मंदिर राम भक्तांसाठी खुले होणार आहे. मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर येथे लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येणार आहेत. अजून मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झालेला नाही तरी देखील लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येथे येतात.
मात्र जेव्हा मंदिर सुरू होईल तेव्हा या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे राम भक्तांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून एका अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येला लवकरच वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे. यामुळे राम भक्तांचा प्रवास आणखी सुलभ, जलद आणि अतिशय आरामदायी होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
खरंतर वंदे भारत ट्रेन ही संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन आहे. ही गाडी अल्पावधीतच रेल्वे प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. यामुळे भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशातील विविध मार्गावर ही गाडी चालवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या देशातील 34 महत्त्वाच्या रेल्वे मार्गांवर ही गाडी सुरु आहे.
अशातच आता देशातील आणखी एका महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, वाराणसी ते लखनऊ दरम्यान ही गाडी चालवली जाणार आहे. विशेष म्हणजे या मार्गावरील ही गाडी अयोध्या मार्गे चालवली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
यामुळे वाराणसी ते अयोध्या हा प्रवास गतिमान होणार आहे. वाराणसीला काशीविश्वेश्वराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लोकांना आता जलद गतीने अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता येणार आहे. यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल असे सांगितले जात आहे. दरम्यान याबाबतचा प्रस्ताव हा रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
रेल्वे बोर्डाने मात्र अद्याप याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही. परंतु लवकरच रेल्वे बोर्ड यावर सकारात्मक निर्णय घेईल असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे पुढल्या वर्षी भव्य राम मंदिराचे लोकार्पण होणार असल्याने त्याआधीच ही ट्रेन सुरू करण्याचा निर्णय होणार असल्याचे चित्र तयार होत आहे. यामुळे आता रेल्वे बोर्ड यावर काय निर्णय घेते आणि वाराणसी ते लखनऊ वाया आयोध्या ही वंदे भारत ट्रेन केव्हा सुरू होईल याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहणार आहे.
कसा असेल रूट ?
मीडिया रिपोर्टनुसार, वाराणसी ते लखनऊ वंदे भारत ट्रेन ही लखनौमार्गे जंघाई, अयोध्या अशी धावणार आहे. पण या गाडीला सुलतानपूर आणि प्रतापगड या स्थानकांवर थांबा दिला जाणार नाहीये. या गाडीच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर ही गाडी दुपारी वाराणसीतून आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लखनौहून चालवण्याची योजना आखण्यात आली आहे.