Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली हायस्पीड ट्रेन आहे. या गाडीची लोकप्रियता एवढी अधिक आहे की, प्रवाशांच्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.
लोकप्रतिनिधी देखील आपल्या भागातील रेल्वे प्रवाशांसाठी या हायस्पीड ट्रेनच्या संचालनासाठी रेल्वे मंत्रालयाकडे आपल्या स्तरावर पाठपुरावा करत आहेत. तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच या गाडीने प्रवास करणे आवडत आहे.
दरम्यान, या गाडीची लोकप्रियता पाहता भारतीय रेल्वेने आत्तापर्यंत 41 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू केले आहे. विशेष बाब अशी की, येत्या काही महिन्यात आणखी काही नवीन मार्गांवर ही गाडी सुरू होणार आहे.
आपल्या महाराष्ट्राला देखील लवकरच काही नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट दिली जाणार आहे. सध्या राज्यातील 7 महत्त्वाच्या मार्गांवर या प्रकारची ट्रेन धावत आहे. यापैकी पाच गाड्या राजधानी मुंबईवरून धावत आहेत.
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर या मार्गांवर सध्या ही गाडी सुरू आहे.
याशिवाय राज्यातील नागपूर ते बिलासपुर आणि नागपूर ते इंदोर या मार्गावर देखील या गाडीचे संचालन सुरू झाले आहे. म्हणजेच महाराष्ट्रातून 14 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू आहेत.
विशेष म्हणजे लवकरच मुंबई ते शेगाव, पुणे ते शेगाव, पुणे ते सिकंदराबाद, मुंबई ते छत्रपती संभाजी नगर, पुणे ते वडोदरा अशा विविध मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू होण्याची आशा आहे.
मात्र या मार्गांवर ही हायस्पीड ट्रेन केव्हा सुरू होणार याबाबत अजून कोणतीच माहिती रेल्वे बोर्डाकडून समोर आलेली नाही.
अशातच, मात्र देशातील आणखी एका महत्त्वाच्या मार्गांवर या हायस्पीड ट्रेनचे संचालन सुरू होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रांची ते वाराणसी या मार्गावर ही हाय स्पीड ट्रेन लवकरच सुरू होणार आहे.
रांचीचे खासदार संजय सेठ यांनी याबाबत माहिती दिली आहे. तथापि, या गाडीचे संचालन केव्हा सुरू होणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.