Vande Bharat Train : भारतीय रेल्वेचा प्रवास हा आधीच्या तुलनेत आता खूपच सुरक्षित आणि आरामदायी झाला आहे. रेल्वेकडून आपल्या प्रवाशांसाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हायस्पीड ट्रेन देखील रेल्वेच्या ताफ्यात आल्या आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा खूपच सोयीचा होत आहे.
आत्तापर्यंत देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे. यापैकी सात मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत.
राज्यातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर आणि नागपूर ते इंदोर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
विशेष म्हणजे आगामी काळात महाराष्ट्रातील आणखी काही महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू होणार अशी माहिती हाती आली आहे.
राज्यातील मुंबई ते कोल्हापूर, पुणे ते वडोदरा, मुंबई ते शेगाव, पुणे ते शेगाव, मुंबई ते छत्रपती संभाजी नगर, पुणे ते सिकंदराबाद इत्यादी मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू होणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
अशातच, मात्र बिहारची राजधानी पटना ते लखनऊ दरम्यान पुढील आठवड्यात वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याचे वृत्त एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आले आहे.
ही गाडी अयोध्या मार्गे चालवली जाणार आहे. यामुळे बिहार येथील राम भक्तांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी राहणार आहे.
बिहार मधील राम भक्तांना या गाडीने जलद गतीने श्रीक्षेत्र अयोध्या येथे जाता येणार आहे. या वंदे भारत एक्सप्रेसचा रेक शनिवारी पटना जंक्शनवर पोहोचणार अशी माहिती समोर येत आहे.
यामुळे पुढील आठवड्यातच या वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन होणार असे चित्र पाहायला मिळत आहे.