Vande Bharat Train : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे मुंबई, पुण्यासारख्या मेट्रो शहरांमधून मोठ्या प्रमाणात प्रवासी आपल्या मूळ गावाकडे रवाना होत आहेत. अशातच मुंबईतल्या रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 चे विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने 23 मे पासून ते मे अखेर पर्यंत अर्थातच 31 मे पर्यंत रात्री 12:30 पासून ते सकाळी साडेचार वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे.
या विस्तारीकरणाच्या कामांमुळे मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रद्द झालेल्या एक्सप्रेस ट्रेन मध्ये वंदे भारत एक्सप्रेसचा देखील समावेश आहे. याशिवाय काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर या ब्लॉकमुळे लोकल सेवेवर देखील विपरीत परिणाम होणार आहे.
लोकल वेळापत्रकात बदल होणार
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी ब्लॉकचा कालावधी असेल तेव्हा भायखळा ते सीएसएमटी दरम्यान लोकल उपलब्ध राहणार नाही. ब्लॉक सुरू होण्यापूर्वी सीएसएमटीहून डाऊन धीम्या मार्गावरील रात्री १२.१४ ची कसारा लोकल ही शेवटची लोकल राहणार आहे.
ब्लॉकनंतरची पहिली कर्जत लोकल पहाटे ४.४७ वाजता सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. रात्री ९.४३ ची कर्जत-सीएसएमटी, रात्री १०.३४ कल्याण-सीएसएमटी ही शेवटची लोकल राहणार आहे.
कोणत्या एक्सप्रेस गाड्या रद्द राहणार?
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार सी एस एम टी रेल्वे स्थानकात होत असलेल्या कामामुळे सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस २८ मे ते ३१ मेपर्यंत रद्द राहणार आहे. तसेच पुणे- सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस देखील २८ मे ते ३१ मेपर्यंत रद्द राहणार आहे. पुणे- सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस 31 मे रोजी रद्द केली जाणार आहे.
नांदेड- सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस देखील 31 मे ला रद्द केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस ही 31 मे 2024 ला रद्द राहणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना काही काळ मनस्ताप सहन करावा लागणार आहे.