Vande Bharat Train : भारतात आत्तापर्यंत जेवढ्या वंदे भारत एक्सप्रेस धावत होत्या त्या सर्व ट्रेन 16 डब्यांच्या आणि आठ डब्यांच्या होत्या. मात्र भारतात पहिल्यांदाच २० डब्यांची वंदे भारत ट्रेन आता रुळावर आली आहे. देशातील पहिली 20 डब्ब्यांची वंदे भारत ट्रेन नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर, या ट्रेनचा मान आपल्या महाराष्ट्राला मिळाला.
देशातील दुसरी 20 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन नागपूर आणि सिकंदराबाद जंक्शन दरम्यान सुरु करण्यात आली आहे. या ट्रेनचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. अलीकडेच उद्घाटन झालेल्या नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसने महाराष्ट्र आणि तेलंगणा दरम्यानच्या प्रवासाचा कायापालट केला आहे.
या गाडीमुळे या दोन्ही राज्यांच्या कनेक्टिव्हिटीला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवले आहे. नागपूर ते सिकंदराबाद हा प्रवास या गाडीमुळे अधिक जलद होऊ लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 सप्टेंबर 2024 रोजी अहमदाबाद येथून या सेवेचे उद्घाटन केले.
आठवड्यातून सहा दिवस चालणारी, ही एक्स्प्रेस ट्रेन 575 किमी (357 मैल) अंतर केवळ 7 तास आणि 15 मिनिटांच्या प्रभावी वेळेत पार करण्यास सक्षम ठरली आहे. खरे तर, महाराष्ट्रात आधी आठ वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत्या.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद यादरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू केली आहे, म्हणून ही वंदे भारत ट्रेनची संख्या 11 वर पोहोचली आहे.
नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस चे टाईम टेबल
नागपूर-सिकंदराबाद-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस मंगळवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस चालवली जाणार आहे. नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस नागपूर जंक्शन (NGP) येथून 05:00 वाजता सोडली जाणार आहे आणि सव्वा बारा वाजता ही ट्रेन तिच्या गंतव्यस्थानी म्हणजेच सिकंदराबाद ला पोहोचणार आहे. त्याचप्रमाणे सिकंदराबादवरून दुपारी १ वाजता निघून रात्री ८.२० वाजता नागपूरला पोहोचणार आहे.
नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस कुठे थांबा घेणार?
नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस नागपूर जंक्शन, सेवाग्राम जंक्शन, चंद्रपूर, बल्हारशाह, रामागुंडम, काझीपेठ जंक्शन आणि सिकंदराबाद जंक्शन या एकूण सात स्थानकांवर थांबणार आहे.