Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील बहुचर्चित एक्सप्रेस ट्रेन आहे. ही देशातील पहिली भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन असल्याचा दावा केला जातोय. या गाडीची लोकप्रियता देशात एवढी वाढली आहे की, अल्पकालावधीतच लोकप्रियच्या बाबतीत या गाडीने शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसला मात दिलेली आहे.
प्रत्येकालाच या गाडीने प्रवास करण्याची इच्छा आहे. यामुळे प्रवाशांच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या मार्गांवर गाडीला सुरू करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी रेल्वे कडे प्रवासी संघटना पाठपुरावा करत आहेत.
लोकप्रतिनिधी देखील ही हायस्पीड ट्रेन त्यांच्या मतदारसंघात धावली पाहिजे यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे मोठा पाठपुरावा करत असल्याचे चित्र वेळोवेळी समोर आले आहे.
अशातच आता राज्यातील तीन शहरांसाठी महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. राज्याची उपराजधानी नागपूर, सांस्कृतिक राजधानी पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या तीन शहरांना आता लवकरच आणखी वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार अशी शक्यता आहे.
खरंतर या तिन्ही शहरांमधून सध्या वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. नागपूरहुन नागपूर ते बिलासपूर आणि नागपूर ते इंदूर या मार्गावर ही गाडी सुरू आहे. तसेच पुणे आणि सोलापूरकरांना एका गाडीचा लाभ मिळतं आहे, मुंबई ते सोलापूर ही गाडी पुण्यामार्गे धावत आहे.
अशातच आता सोलापूर विकास मंचाने तीन नवीन वंदे भारत सुरू व्हाव्यात यासाठी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे मागणी केली आहे. सोलापूर विकास मंचाने सोलापूर ते गोवा, सोलापूर ते नागपूर आणि पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली गेली पाहिजे अशी मागणी केली आहे.
विशेष बाब अशी की यापैकी पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असे वृत्त मागे देखील समोर आले होते. पुणे ते सिकंदराबाद ही गाडी सोलापूर मार्गे चालवली जाईल अशी शक्यता आहे.
सध्या या मार्गावर शताब्दी एक्सप्रेस सुरू असून ती एक्सप्रेस बंद करून त्याऐवजी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वेकडे प्रस्तावित असल्याचे बोलले जात आहे.
यामुळे आता सोलापूर विकास मंचाची मागणी खरच पूर्ण होणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. खरे तर सध्या महाराष्ट्रातून सात वंदे भारत ट्रेन धावत आहेत.
विशेष म्हणजे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची महाराष्ट्राला भेट मिळण्याची शक्यता नाकारून चालणार नाही. यामुळे राज्यात आता वंदे भारत एक्सप्रेसचे देखील जाळे तयार होणार आहे.