Vande Bharat Train Solapur : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली हाय स्पीड ट्रेन आहे. सध्या स्थितीला ही गाडी देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर धावत आहे. यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातून जातात हे विशेष. राज्यातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर दरम्यान सुद्धा वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे.
ही गाडी पुण्या मार्गे धावत असून या गाडीचा पुणे आणि सोलापूरवासियांना मोठा फायदा होत आहे. सोलापूरवासियांना या गाडीमुळे जलद गतीने पुणे आणि मुंबईच्या दिशेने जाता येत आहे. परिणामी या गाडीला सोलापूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.
अशातच आता सोलापूर शहरातील नागरिकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेससाठी तिसरा कोचिंग डेपो बांधला जाणार आहे.
हा तिसरा डेपो सोलापुरात विकसित होणार असून याचे काम मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून केले जाणार आहे. यासाठी 50 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या डेपोसाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.
सध्या मध्य रेल्वे मार्गावर मुंबई विभागात वाडी बंदर येथे वंदे भारत एक्सप्रेस साठीचा कोचिंग डेपो आहे. तसेच दुसरा डेपो हा पुण्यातील घोरपडी भागात तयार होत आहे.
आता सोलापुरात विकसित होणारा हा मध्य रेल्वे मार्गावरील तिसरा डेपो राहणार आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूरला डेपो झाल्यानंतर येथेच डब्यांची देखभाल व दुरुस्ती केली जाईल.
परिणामी भविष्यात सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई ते सोलापूर वंदे भारत सुरु आहे. मात्र हा डेपो विकसित झाल्यानंतर सोलापूरहून सुटणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ची संख्या वाढणार आहे.
साहजिकच याचा सोलापूरकरांना मोठा फायदा होणार आहे. सोलापूरला तयार होत असलेला या डेपोमध्ये ६०० मीटर लांबीची नवीन पिटलाइन राहणार आहे.
डब्यांच्या सुरक्षेसाठी कव्हर्ड शेड बांधण्यात येणार आहे.या डेपोमध्ये एक रेकच्या देखभाल व दुरुस्तीसाठी किमान ६ तास लागतील. यासाठी एक स्वतंत्र इमारत बांधली जाणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरला कोचिंग डेपो होणे ही सोलापूर सहित संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी विशेष गोष्ट आहे. यामुळे भविष्यात सोलापूरहून आणखी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू होऊ शकतात अशी आशा बोलून दाखवली जात आहे.